Covid-१९ लसीकरण कामाचा मोबदला आशा व गटप्रवर्तक महिलांना देण्यात यावा

महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेची शासनाकडे मागणी  

भारत सरकारचे covid-१९ चे काम करणाऱ्या आशा, गटप्रवर्तक व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना मोबदला देण्याचे निर्देश आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात होत नसल्याने याविरुद्ध लॉक डाऊन काळात सुद्धा आशा व गटप्रवर्तक महिलांना आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही. 

सध्या Covid-१९ लसीकरण जोरात सुरू आहे. लसीकरणा मध्ये सुद्धा आशा व गटप्रवर्तक महिलांना  काम करण्यास सांगितले जात आहे. परंतु या लसीकरण कामासाठी मोबदला आशा व गटप्रवर्तक महिलांना किती देणार ? हे अजूनही शासनाने घोषित केलेले नाही. राष्ट्रीय आरोग्य अभियान यांनी यापूर्वी अनेक वेळा घोषित केलेले आहे की, ज्या कामाचा मोबदला आशा व गटप्रवर्तक महिलांना दिला जाणार नाही. अशी कामे आशा व गटप्रवर्तक महिलांच्या कडून करून घेतली जाणार नाहीत. परंतु सर्वच अधिकारी या महत्त्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष करून त्यांच्याकडून दररोज आठ ते नऊ तास सक्तीने काम करून घेत आहेत. Covid-19 या कामाचा मोबदला राष्ट्रीय आरोग्य अभियान कडून आशा महिलांना दरमहा एक हजार रुपये व गटप्रवर्तक महिलांना दरमहा पाचशे रुपये दिला जातो असा तुटपुंजा मोबदला सुद्धा मागील चार महिन्यापासून या महिलांना मिळालेला नाही.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशा व गटप्रवर्तक महिलांच्या कामासंबंधी जे निकष व गाईडलाईन्स दिलेले आहेत त्यामध्ये दररोज आशा महिलांना दोन ते तीन तास इतकेच काम द्यावे असे निर्देश आहेत. परंतु मागील एक वर्षापासून राष्ट्रीय आरोग्य अभियान मार्फत आशा महिलांना दररोज नवनवीन कामे सांगितली जात आहेत.त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी त्यांच्या मनाला येईल ते आणि केव्हाही आशा व गट प्रवर्तक महिलांना काहीही काम सांगितले जात आहे. वरील महत्त्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आयटक कामगार संघटनेच्या वतीने १० एप्रिल २०२१ रोजी सविस्तर निवेदन पाठवले आहे.त्यांनी या निवेदनाची त्वरीत दखल घेऊन हे निवेदन योग्य त्या कार्यवाहीसाठी शासनाच्या आरोग्य विभागाकडे पाठवलेले आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कॉ शंकर पुजारी, युनियनचे सरचिटणीस कॉ सुमन पुजारी व सहसचिव कॉ विजय बचाटे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.