कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) प्रमाणे नोकरी बदलण्यावरही ग्रॅच्युइटी हस्तांतरणाची (Gratuity Transfer) संधी कर्मचार्यांना मिळू शकणार आहे. उद्योग आणि कर्मचारी संघटनांमध्ये ग्रॅच्युइटी पोर्टेबिलिटीवरील करारावर सहमती झाल्यानंतर नोकरी बदलल्यास ग्रॅच्युइटी ट्रान्सफर व्यवस्था लागू होईल.
केंद्र सरकारतर्फे ग्रॅच्युइटीच्या रचनेत बदल करण्यासंदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार कोणत्याही कंपनीमध्ये सलग पाच वर्षे काम केल्यानंतर ग्रॅच्युइटी मिळते. मात्र नवीन नियमांनुसार केवळ एक वर्ष काम केलं तरी कर्मचारी ग्रॅच्युइटीवर हक्क सांगू शकतील. त्याचबरोबर ग्रॅच्युइटी ही सीटीसीचा एक आवश्यक भाग बनविण्यासदेखील प्रयत्न सुरू आहेत.
नियमानुसार वर्षभराच्या नोकरीवर १५ दिवसांच्या पगाराइतकी ग्रॅच्युइटी मिळते. त्यातदेखील वाढ करण्याची मागणी केली जात असून ती ३० दिवसांची करावी, अशी मागणी केली जात आहे. याबाबतही निर्णय अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे.
ग्रॅच्युइटीमधील २० लाखांपर्यंतची रक्कम करमुक्त असणार आहे.
ग्रॅच्युइटीचा फायदा कोठे मिळतो :
पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी ऍक्ट १९७२ नुसार ज्या कंपनीत दहापेक्षा अधिक कामगार काम करतात त्या प्रत्येक संस्थेमध्ये ग्रॅच्युइटीचा लाभ मिळवता येतो. जर कर्मचाऱ्याने नोकरी बदलली किंवा सोडली, निवृत्त झाला आणि ग्रॅच्युइटीचे नियम पूर्ण केले असतील तर ग्रॅच्युइटीचा लाभ मिळतो.