Domestic women workers' union will protest against the rising price of gas cylinders.
घरेलु कामगार महिलांना तुटपुंज्या पगारात काम करत असताना सतत होणाऱ्या गॅस दरवाढीमुळे महिन्याचा घरखर्च कसा करावा, त्यातच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती देखील आकाशाला भिडल्या आहेत. घरेलू कामगार यांचे पगार वाढत नाही तसेच कोणत्याही शासकीय योजना नाहीत यामुळे या सामान्य कामगार वर्गांने कसे जगावे याचा विचार सरकारने करावा. अशी मागणी महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटनेचे सरचिटणीस शरद पंडीत यांनी केली.
गेल्या वर्षात लॉकडाऊनच्या काळातील त्रासदायक वाईट प्रसंगातून आत्ता कुठे सामान्य घरेलु कामगार सावरत आहेत, तोच गॅस दरवाढीमुळे महिन्याचा घरखर्च कसा करावा, दोन वर्षापूर्वी गॅस सिलेंडर ४००/-रुपयाला मिळत होता तो आता ८३०/- रुपयाला मिळतो आहे. गॅस सिलेंडरचे भाव त्वरित कमी करावेत याकरिता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना संघटनेच्या वतीने (८ मार्च ते १२ मार्च दरम्यान) प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात येईल. निवेदन दिल्यानंतर सुध्दा सिलेंडरचे भाव कमी झाले नाहीत तर केंद्र सरकारच्या दरवाढीचा जाहीर निषेध करण्यासाठी महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटना महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असे शरद पंडीत यांनी सांगितले.