बालकामगार व किशोरवयीन कामगार अधिनियम जनजागृती कार्यशाळा कामगार कार्यालय पुणे येथे संपन्न

पुणे : कामगार उपायुक्त, पुणे यांचे अध्यक्षतेखाली पुणे विभागातून बालकामगार प्रथेचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने समाजाच्या विविध घटकांमध्ये बालकामगार व किशोरवयीन कामगार कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम १९८६ व सन २०१६ मध्ये झालेल्या बदलाबाबत जनजागृती करण्यासाठी दि.५ मार्च रोजी अपर कामगार आयुक्त, पुणे विभाग पुणे यांच्या दालनात सकाळी ११ वाजता कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

     सदर कार्यक्रमास अभय गीते सहाय्यक कामगार आयुक्त पुणे, आजिनाथ खरात सहाय्यक कामगार आयुक्त, चेतन जगताप सहाय्यक कामगार आयुक्त, दत्तात्रय पवार सरकारी कामगार अधिकारी, श्रीकांत चौभे सरकारी कामगार अधिकारी, पोलीस विभागाचे विनायक कोळी, महिला व बालविकास यांचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, पुणे विभागातील सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यात कार्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

     कार्यक्रमाच्या सुरुवातीस समिर चव्हाण सहाय्यक कामगार आयुक्त पुणे यांनी प्रास्तविक केले. डि.डि. पवार सरकारी कामगार अधिकारी यांनी बाल कामगार व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम १९८६ याबाबत व सदर अधिनियमात झालेल्या बदलाबाबत सविस्तर माहिती दिली. उपस्थितांच्या विविध प्रश्नांबाबत मुक्तसंवाद द्वारे चर्चा करण्यात आली, व बालकामगार व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम १९८६ अंतर्गत जनजागृती करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले. शेवटी उपस्थितांचे आभार मानून सदरील कार्यशाळा संपन्न झाली.