PF वरती २०२०-२१ करिता मिळणार ८.५% व्याज !

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) २०२०-२१ करीता ईपीएफ ठेवींवर ८.५ टक्के व्याज दर निश्चित केला आहे. केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या श्रीनगर बैठकीत गुरूवारी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

ईपीएफच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची २२८ वी बैठक पार पडली. केंद्रीय कामगार आणि रोजगार (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तर अपूर्व चंद्रा, सचिव (कामगार आणि रोजगार) हे उपाध्यक्षस्थानी होते तसेच सदस्य सचिव सुनील बर्थवाल आणि केंद्रीय पी एफ आयुक्त देखील या बैठकीला उपस्थित होते.  केंद्रीय मंडळाने २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी सदस्यांच्या खात्यात ईपीएफची रक्कम जमा झाल्यावर ८.५% वार्षिक व्याज दराने रक्कम जमा करण्याची शिफारस केली. सरकारच्या राजपत्रात व्याजदर अधिकृतपणे सूचित केल्यानंतर ईपीएफओ ग्राहकांच्या खात्यात व्याजदराची रक्कम जमा केली जाईल.

आर्थिक वर्ष २०१४ पासून ईपीएफओने सातत्याने ८.५० टक्के किंवा त्याहून अधिक दराने परतावा दिलेला आहे. कंपाऊंडिंगसह उच्च ईपीएफ व्याज दरामुळे, ग्राहकांच्या नफ्यात महत्त्वपूर्ण फरक पडतो.