जर तुम्ही निर्धारीत वेळेपेक्षा १५ मिनीटेही जास्त काम केलं तरी तो ओव्हरटाईम मानण्यात येईल आणि त्याचे वेतन देणं कंपन्यांना अनिवार्य असेल अशी तरतूद केंद्र सरकारच्या नव्या कामगार कायद्यात असल्याची माहिती आहे.
नियोजित वेळेपेक्षा अगदी १५ मिनिटं अधिक काम केलं तरी तो ओव्हरटाइम ठरेल आणि त्यासाठी कंपन्यांना कर्मचाऱ्यांना वेतन द्यावं लागेल. इतकच नाही तर अशापद्धतीने ओव्हरटाइमचे पैसे देणे कंपनीला बंधनकारक असणार आहे. यासंदर्भातील नियमांचा नवीन कामगार नियमांमध्ये समावेश असेल अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
देशात नवीन कामगार कायदे लागू करण्यासाठीच्या नियमावलीला सरकारच्या वतीनं अतिम स्वरुप देण्यात आलं आहे. त्यामुळे येत्या आर्थिक वर्षापासून नवीन कायदे लागू होण्याची शक्यता आहे.
देशात सध्या लागू असलेल्या कामगार कायद्यानुसार, आपल्या कामापेक्षा अर्धा तास जरी अतिरिक्त काम केलं तर तो ओव्हरटाइम मानण्यात येतोय.
नवीन कामगार कायद्याने सर्व कर्मचाऱ्यांना पीएफ आणि ईएसआय या सारख्या सुविधा मिळतील हे कंपन्यांना पहावं लागेल. यापैकी कोणतीही गोष्ट कंपनी नाकारु शकणार नाही. कॉन्ट्रॅक्ट बेसवर असलेल्या तसेच थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्टवर असलेल्या कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.