कामगारांना किमान २० हजार रुपये वेतन द्या

लोणावळ्यात शिवक्रांती कामगार संघटनेचा राज्यव्यापी कामगार प्रतिनिधी मेळावा संपन्न

लोणावळा - आजच्या परिस्थितीमध्ये घर चालविण्यासाठी व मुलांच्या शिक्षणांसाठी किमान १५ ते १८ हजार रुपये लागतात. अशा काळात कामगारांना १० ते १२ हजार किमान वेतन देऊन कसे चालेल, याकरिता कामगारांना किमान वेतन २० हजार रुपये एवढे मिळायलाच हवे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लोणावळ्यात कामगार प्रतिनिधी मेळाव्यात केले.

शिवक्रांती कामगार संघटनेचा राज्यव्यापी कामगार प्रतिनिधी मेळावा सोमवारी (दि. १) लोणावळ्यात पार पडला. या मेळाव्यात प्रमुख वक्‍ते म्हणून शिवक्रांती कामगार संघटनेचे नवनिर्वाचित मुख्य सल्लागार प्रवीण दरेकर यांनी कामगार प्रतिनिधींना मार्गदर्शन केले.

या वेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, शिवक्रांती कामगार संघटनेचे सरचिटणीस ऍड.विजयराव पाळेकर, शिक्षण समिती सभापती ब्रिंदा गणात्रा, रायगड जिल्हा भाजपाचे सरचिटणीस विनोद साबळे, रमेश पाळेकर, रोहन आहेर, प्रथमेश पाळेकर, योगीता कोकरे, गुलाबराव मराठे, रवींद्र साठे, राजेंद्र पवार, हनुमंत कलाटे यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना दरेकर म्हणाले की, शिवक्रांती कामगार संघटनेत काम करताना कामगारांच्या विश्‍वासाला तडा जावू देणार नाही. पाळेकर यांचे कामगारांसाठी असलेले योगदान पाहून मी या संघटनेचे सल्लागार पद स्वीकारले आहे. कामगाराच्या गृहनिर्माण योजना आपल्या ताकदीवर करू, शासनाकडून एखादा भूखंड मिळाल्यास अल्पदरात कर्ज देऊन कामगार वसाहती उभ्या करू असे सांगितले.

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे म्हणाले की, कामगारांच्या हितासाठी नि:स्वार्थपणे काम करणारी संघटना अशी शिवक्रांती कामगार संघटनेची ओळख आहे. संघर्षातून ही संघटना उभी राहिली आहे. 

कामगार नेते विजयराव पाळेकर म्हणाले मावळ तालुका व चाकण परिसर औद्योगिक हब झालेला असला तरी कामगार प्रश्‍नांसाठी पुण्यात जावे लागते. याकरिता चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये कामगार आयुक्तालयाची स्थापना व्हावी. कामगारांसाठी रुग्णालय व्हावे, घरकुल योजना व्हावी, तसेच कामगारांना न्याय लवलरात लवकर मिळावा याकरिता फास्टट्रक कोर्ट सुरू व्हावे, अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांकडे केली.

पाळेकर म्हणाले की, कामगारांना न्याय मिळवून देताना कंपनीवर अन्याय होणार नाही याचीही काळजी घेतली. त्यांना आवश्‍यक असलेले उत्पादन मिळवून दिले. समतोल साधल्याने संघर्ष करण्याची वेळ आली नाही. प्रास्ताविक संघटक रोहन आहेर आणि प्रतीक पाळेकर यांनी केले. रवींद्र साठे यांनी आभार मानले.