गुणवंत कामगार पुरस्कारांचे मंगळवारी वितरण, १०६ कामगार पुरस्कार्थीं यांची यादी पहा

Maharashtra Labour Welfare Board  (MLWB) organizes Meritorious Workers Award Ceremony on 9th February 2021 in Mumbai.

मुंबई : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे गुणवंत कामगार पुरस्कार वितरण सोहळ्याचे मंगळवार, दिनांक ९ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी ४.०० हुतात्मा बाबू गेनू गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजन करण्यात आले आहे. सन २०१५ आणि २०१७ मधील एकूण १०६ कामगारांना पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. यात २ कामगार भूषण आणि १०४ गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार्थींचा समावेश असेल.

मा.उपमुख्यमंत्री अजित पवार, मा. कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, मा. कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, खासदार राहुल शेवाळे, आमदार कालिदास कोळंबकर, प्रधान सचिव (कामगार) श्रीमती विनिता वेद-सिंघल, कामगार आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, कल्याण आयुक्त रविराज इळवे या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अंतर्गत मंडळाकडे नोंदीत आस्थापनात काम करणार्‍या तसेच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, साहित्य, संघटन आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कामगार / कर्मचाऱ्यांची सदर पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. सन २०१५ चा कामगार भूषण पुरस्कार महेश यशवंतराव सेवलीकर (बजाज ऑटो लि.बजाज नगर, वाळूज, औरंगाबाद) तर २०१७ चा कामगार भूषण पुरस्कार विजय भुपाल पिसे (किर्लोस्कर ब्रदर्स लि. ता. पलुस, जि. सांगली) यांना प्रदान केला जाणार आहे. तसेच २०१५ मधील ५१ आणि सन २०१७ मधील ५३ कामगारांना गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कार्यक्रमस्थळी प्रत्यक्षात उपस्थित राहण्यासाठी मर्यादित निमंत्रणे देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यामुळे पुरस्कार्थीं व कुटुंबीय व्यक्ती, निमंत्रित अस्थापना प्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधी या व्यतिरिक्त इतर व्यक्तींना कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यावर मर्यादा आल्या आहेत. तथापि सोहळ्याचे आनंदापासून कोणी वंचित राहू नये म्हणून सदर सोहळ्याचे थेट प्रक्षेपण युट्युब (https://youtube.com/channel/UC0WkFB-hAsaRNLTwGxYjXiQ) तसेच फेसबुक द्वारे (https://www.facebook.com/mahalabourwelfare) या समाज माध्यमांवर करण्यात येणार आहे.  सर्वांनी थेट प्रक्षेपण सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.


गुणवंत कामगार पुरस्कार्थीं यांची यादी पहा - क्लीक List