उद्योग ४.० (Industry 4.0) आणि रोजगार

पहिली औद्योगिक क्रांती ही १८व्या शतकात झाली, ती वाफेच्या शक्तीवर यंत्र चालवून उत्पादन निर्मिती केली गेली. विजेचा शोध लागल्यानंतर दुसरी औद्योगिक क्रांती १९व्या शतकात झाली. तेव्हा वि‍जेमुळे ‘मास प्रॉडक्‍शन’ (Mass Production) होऊ लागलं. या औद्योगिक क्रांतीने जशी सुबत्ता आणली तसेच त्याचे वाईट परिणामही आले. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी कमी होण्याऐवजी वाढतच गेली. याच वेदनेतून समाजवाद, साम्यवाद अशा विचारसरणी अस्तित्वात येऊन भांडवलशाही व्यवस्थेवर आसूड ओढले जाऊ लागले. या बदलणाऱ्या अर्थकारणाने जग विभागले गेले. हे  सर्व पहिल्या व दुसऱ्या तंत्रज्ञान क्रांतीची फलित होय !

        या दोन औद्योगिक क्रांतीनंतर तिसरा टप्पा होता तंत्रज्ञान क्रांतीचा.१९६०च्या दरम्यान या अंतर्गत, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर स्वयंचलित उत्पादनासाठी केला गेला तो टप्पा होता साध्यासुध्या ‘डिजिटायझेशन’चा (Digitization). या तंत्रज्ञानाने आणलेल्या या औद्योगिक क्रांतीने मोठ्या  प्रमाणावर उत्पादकता, रोजगार वाढवले, मालाची मागणी, सेवांची गुणवत्ता वाढवली. आपण गेल्या ५० वर्षांत भारतात झालेल्या पोलाद, मोटार उद्योग, वाहतूक सेवा इत्यादींतील बदल बघितले तर आपल्या हे लक्षात येईलच. या तंत्रज्ञान क्रांतीमुळे ज्या यंत्रांची निर्मिती झाली त्या बहुतेक सर्व यंत्रांनी माणसाच्या शारीरिक कष्टांची जागा घेतली. उदाहरणार्थ- वजन उचलण्याच्या यारीने (Crane) १०० माणसांची संपूर्ण दिवसाची मेहनत एका तासात संपविण्याची किमया साधली. माल उत्पादन, खाण उद्योग, वाहतूक या सर्वच क्षेत्रांत माणसाच्या मेहनतीची जागा छोट्या-मोठय़ा यंत्रांनी घेतली. साध्या जमिनीत खड्डा करायला किंवा विहीर खोदायला जेवढी माणसे किंवा दिवस लागायचे, यंत्रांनी तेच काम काही तासांत उरकून उत्पादकता कमालीने वाढवली. यामुळे मोठय़ा प्रमाणात बिनचूक उत्पादन होण्यास व त्याचा परिणाम उत्पादनाच्या खर्चावर होऊन त्या मालाचा मोठय़ा प्रमाणावर पुरवठा करणे शक्य होऊ लागले. पण या प्रत्येक यंत्राबरोबर ते चालवणारा माणूस (Operator) तेथे असणे गरचेचे होते.

       आता औद्योगिक क्रांतीतला चौथा टप्पा सुरु झाला आहे तो म्हणजे ‘उद्योग ४.०’ (Industry 4.0). या इंडस्ट्रीमुळे तंत्रज्ञानावर आधारित भविष्यात अनेक नोकर्‍यांवर संक्रांत येणं आणि नव्या नोकऱ्या निर्माण होणे अपेक्षित आहे. सध्या वाढते तंत्रज्ञान थेट मानवी जीवनात हस्तक्षेप करू लागलं आहे व त्याने मानवी जीवनात सहजरीत्या स्थान प्राप्त केले आहे. याचं लक्षणीय उदाहरण म्हणजे माणसं करत असणारी कित्येक कामं आता संगणकाच्या साह्याने सहज करता येऊ लागली आहे.  

      पहिल्या तीन औद्योगिक क्रांतीनंतर गेली जवळपास दोन-अडीचशे वर्षात यांत्रिकीकरणमुळे अनेक रोजगारांवर  संकट येत आहे. त्याच वेळी बेरोजगारीच्या तुलनेने नव्या रोजगार निर्माण होण्याचं प्रमाण हे अत्यल्प प्रमाणात का होईना वाढले होते. मात्र आता प्रथमच हे चित्र बदलत असल्याचं दिसत आहेत. तंत्रज्ञानावर आधारित रोजगार आणि बेरोजगारीचा आलेख मांडण्यासाठीच हा प्रयत्न.

     आताचा जमाना आहे तो कॉम्प्लेक्‍स डिजिटायझेशनचा.(Complex Digitization).  संगणक आणि प्रोग्रॅमिंगच्या अतिक्‍लिष्ट वाटणाऱ्या काही जोडण्यांनी (integration) आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. याच त्या ‘उद्योग ४.०’. मुळे तंत्रज्ञानावर आधारित अनेक नोकऱ्यांवर संक्रांत येणं आणि नव्या नोकऱ्या निर्माण होणं सर्वांना अपेक्षित आहे. आपल्याला यामध्ये ढोबळ मानाने कामाचे तीन टप्पे करता येतील. पहिला टप्प्यात माणसं करत असलेले शारीरिक कष्टाचे काम हे यंत्रांद्वारे केलं जातं. दुसऱ्या टप्प्यात काही विशिष्ट तंत्रज्ञानामुळं बौद्धिक कामही करता येतं, या कामामध्ये विचारप्रणाली, ज्ञानाधिष्ठित काम यंत्राद्वारे करणं, कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) असे घटक येतात. तिसऱ्या टप्प्यात ग्राहकसेवा क्षेत्रासंदर्भातील (Customer Service) नव्या तंत्रज्ञानामुळे ग्राहक सेवेत (Customer Service) पुरवण्यात येणाऱ्या सेवांमध्ये अधिक सुलभता आली आहे. सेल्फ हेल्प कियॉस्क (Self Help Kiosk) हे या क्षेत्रातील ठळक उदाहरणं. यातून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आजची जी उद्योग ४.० तंत्रज्ञानाची क्रांती होते आहे, त्यात माणसाच्या मेहनतीची जागा यंत्रे घेत असतानाच बुद्धीचीही जागा घेत आहेत. संगणक जेव्हा ८०/९० च्या दशकात घराघरात पोहोचले, त्या वेळी संगणक कितीही वेगवान असला तरी त्याला स्वत:ची बुद्धी नाही व आपण जे सांगू, जी आज्ञावली (Program) पुरवू त्यानुसार काम करणारे ते तंत्रज्ञान होते. पण या डिजिटल क्रांतीच्या ओघात आता येणारी यंत्रे, यंत्रमानव हे माणसांचीच जागा घेत आहेत.   

     नवीन तंत्रज्ञान नवनवीन रोजगार निर्माण करत असते. त्यामुळे नवीन तंत्रज्ञान निर्माण करणाऱ्या अधिक लोकांचीही आपल्याला गरज असते. अशा संशोधकांच्या सोबतीनेच हे नवे तंत्रज्ञान योग्य प्रकारे उपयोगात आणणारे आणि ते जपणारे आवश्‍यक असतात. मग हे नवं तंत्रज्ञान रोबोटिक्‍स (Robotics) क्षेत्रातील असो वा थ्रीडी प्रिंटिंग (3D Printing) क्षेत्रातील. शिवाय नवे तंत्रज्ञान वापरणार्‍या लोकांना साह्य करण्यासाठीही आणखी लोकांची गरज भासते. अंतिमत: नव्या तंत्रज्ञानाला नव्या प्रकारचे कामगार लागतात आणि तेही मोठ्या संख्येत.

     उद्याच्या तंत्रज्ञान क्रांतीमध्ये हे व असे बदल घडून येणार आहेत. आपल्या  अर्थव्यवस्थेत या नवीन बदलांचे परिणाम जाणवू लागले आहेत आणि नवीन स्वरूपाची अर्थव्यवस्था नावारूपाला येत आहे. औद्योगिक उत्पादकता वाढते आहे, पण लोकांची घरटी आमदनी (per household income) मात्र कमी होत आहे. अर्थव्यवस्था वाढते आहे, पण रोजगाराचे प्रमाण मात्र वाढताना दिसत नाही. गरीब-श्रीमंतीतील दरी आणखीच वाढताना दिसत आहे.

      आजच्या औद्योगिक ४.० क्रांतीने अकुशल कामगारांची गरज जवळजवळ संपुष्टात आणली आहे. पण आजही कुशल कामगारांना रोजगाराची हमी आहे ! उद्याच्या तंत्रज्ञानाने कुशल कामगारांची गरजही कमी होत जाईल. तुम्ही केवळ कुशल कामगार आहात म्हणून तुम्हाला रोजगार मिळणार नाही तर आता तुम्हाला ‘अतिकुशल’ कामगार म्हणून वेळ पडल्यास अतिरिक्त शिक्षण घेणे जरुरी आहे. जगातील सर्वच प्रगत देशांत या उद्याच्या तंत्रज्ञान क्रांतीमुळे हे बदल घडणार आहेत. त्या बदलांची व त्यांच्या परिणामांची तीव्रता ही त्या त्या देशातील सामाजिक परिस्थितीप्रमाणे वेगवेगळी असेल. पण सर्वच देशांतील मध्यमवर्गीय समाजावर या बदलांचे जास्तीत जास्त परिणाम झालेले असतील. आपण आजपर्यंत करीत असलेली कामे उद्या यंत्रे करणार आहेत व त्यामुळे उद्या निर्माण होणाऱ्या रोजगारांची तयारी आज करणे जरुरी आहे. भारत आज त्या नवीन क्रांतीला सज्ज व्हायला पाहिजे. ‘मेक-इन-इंडिया’ या घोषणेची अंमलबजावणी करताना हे होणारे बदल लक्षात घेणे जरुरी आहे. कारण या नवीन तंत्रज्ञानाद्वारे उभे राहणारे कारखाने वेगळ्या कौशल्याला रोजगार देणार आहेत. तंत्रज्ञानाचा एक नवीन वर्ग तयार करणार आहेत.

       भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (आर्टिफिशियल इंटेलिजन्स-AI) साधे आणि कौशल्याधारित असे दोन्ही प्रकारचे रोजगार हिरावून घेतले जातील. कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि यंत्रांना विचार करण्याची क्षमता प्रदान करणे अशा क्षेत्रांतील प्रगतीमुळे भविष्यात मानवाकडून कुशल आणि अकुशल असे दोन्ही प्रकारचे रोजगार हिरावून घेतले जाणार आहेत. पुढील १० ते १५ वर्षांनंतर मानवासाठी केवळ अशीच कामे उरतील ज्यांत अत्युच्च वैचारिक क्षमतेची किंवा विशेष मानवी भाव भावनांची अथवा कौशल्यांची गरज असेल. मात्र यांत्रिकीकरणाने मानवी रोजगार जातील, यंत्रे मानवांची जागा घेतील अशा भीतीपोटी भारताने तांत्रिक प्रगतीत जगाच्या मागे पडता कामा नये. तंत्रज्ञान स्वीकारण्यातील मोठी अडचण म्हणजे यंत्रे मानवाची कामे करू लागतील ही भीती होय. पण तंत्रज्ञातील क्रांती होऊन २०० वर्षे उलटली तरी अद्याप मानवाकडे बरीच कामे शिल्लक आहेत. त्यामुळे ही भीती अनाठायी आहे. जी कामे यंत्रे करू शकत नाहीत अशी विशेष कामे कायम मानवाकडेच राहतील. तंत्रज्ञानामुळे रोजगारांचे स्वरूप बदलेल. विशेष क्षमता आणि कल्पकतेची गरज असलेली कामे मानवाकडेच राहतील हे मात्र नक्की. 

       याशिवाय जागतिक स्तरावर अर्थव्यवस्थेत ‘गिग  अर्थव्यवस्था’ (Gig Economy) एक नवीन प्रकारची अर्थव्यवस्था उदयास येत आहे. या अर्थव्यवस्थेमध्ये करारात्मक (contractual) आणि स्वतंत्ररित्या (Freelance) स्वरूपाचा  रोजगार वाढत आहे आणि पारंपारिक रोजगार कमी होत आहेत. रोजगाराचा हे नवीन project based worked हे एक नवीन मॉडेल बनत आहे. त्यातल्या त्यात हायपर-कनेक्टिव्हिटीमुळे आपल्याला जागतिक स्तरावर आपले ज्ञान, कौशल्य, बाजारात आणण्याची परवानगी देते. पण, ‘गिग’ अर्थव्यवस्थेत यश मिळविण्यासाठी सरासरी काम करून चालणार नाही. आपण जे काही करू ते आपल्याला उत्कृष्टच करावे लागणार आहे, आणि आपल्याकडे जोखीम उचलण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. या नवीन अर्थव्यवस्थेच्या नकारात्मक पैलू आहेत जसे की उत्पन्नात वाढ-कपात, कोणतेही कॉर्पोरेट विमा, पेड रजा आणि कोणतेही पेन्शन मिळणार नाही. 

     येत्या काळात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करतांना ‘अतिकुशल’ कामगार म्हणून स्वतःला सोयीस्करपणे, कोणत्याही प्रकारच्या कामात स्वतंत्ररित्या काम करणे व जोखीम उचलणे हे ‘गिग’ अर्थव्यवस्थेत अनिवार्य होऊन जाईल. 


दिपक शेडे 

लेखक हे शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा  भारतीय कामगार सेनेचे – निमंत्रक आयटी युनिट आणि राज्य कार्यकारणी सदस्य आहेत.