पुणे : अप्पर कामगार आयुक्त ,पुणे यांची कार्यपद्धत ही पक्षपाती व व्यवस्थापन धार्जिणी असल्याचे श्रमिक एकता महासंघने पत्राद्वारे सांगितले आहे. या पत्रानुसार खालील कंपनी बाबत कामगार कार्यालय घेत असलेली भूमिका मांडण्यात आल्या आहेत.
कॉन्सेट्रीक पंम्स पुणे प्रा. लि. लोणीकंद नगर रोड पुणे
या कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने ३५ कामगार कपात करण्याचा अर्ज कामगार कार्यालया कडे केलेला आहे यावरती कामगार संघटनेने आपले म्हणणे मांडले असून यावरती कोणताही निर्णय होत नाही.
केअर इसेन्शियल इंटरनॅशनल प्रा.लि. रांजणगाव MIDC
सदर कंपनीने स्टँडिंग ऑर्डर च्या तरतुदींच्या भंग, कामगारांना पगाराची पावती न देणे तसेच कंत्राटी कामगारांकडून काम करून घेणे व कायम कामगारांना काम न देणे याबाबत संघटनेने तक्रार अर्ज सादर करून त्याबाबत कारवाई करण्यात आलेली नाही.
भारत फोर्ज लि. मुंढवा पुणे
कंपनीत पंधराशे (१५००) पेक्षा जास्त कामगार आहेत. त्यापैकी चारशे (४००) कामगार व्यवस्थापनास कमी करायचे आहेत. तुटपुंजी लाभ असणारी योजनासुद्धा व्यवस्थापनाने जाहीर केले आहे. परंतु योजना आकर्षक नसल्याने कामगार ती स्वीकारत नाही ती स्वीकारण्याकरिता संघटनेवर दबाव टाकला जात आहे. कामगार कपात करण्याच्या योजनेस संघटनेने सक्रिय पाठिंबा दिला तरच अठरा महिने प्रलंबित असलेल्या वेतनवाढीच्या करारावर चर्चा सुरू केली जाईल असे सांगितले जाते.
याप्रमाणे बेकायदा कामगार कपात व्यवस्थापन करू पाहत असताना कामगार कार्यालय यावरती कोणतीही कार्यवाही करत नाही.
भारत फोर्ज लि .चाकण, पुणे
ऑगस्ट २०२० पासून १६७ कामगारांना व्यवस्थापनाने ले-ऑफ दिला आहे. ले -ऑफ देण्यापूर्वी औद्योगिक विवाद अधिनियम १९४७ मधील तरतुदीनुसार शासनाच्या पुर्व-परवानगीची अट आहे. त्याचा भंग करून कामगारांना ले-ऑफ देण्यात आले असून त्यांच्या जागी कंत्राटी, शिकाऊ कामगारांच्या नेमणुकी केल्या आहेत. याची चौकशी केली जात नाही
वरील सर्व प्रकरणी कामगार उपायुक्त कार्यालयाची कार्यपद्धत ही व्यवस्थापन धार्जिणी व पक्षपाती आहे. असे मत श्रमिक एकता महासंघ अध्यक्ष दिलीप पवार यांनी व्यक्त केले.