मुंबई : भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांचे अल्पशा आजाराने चेंबूरच्या झेन हॉस्पिटलमध्ये सोमवारी ११ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजता निधन झाले. अंत्यदर्शन आज (मंगळवारी) चेंबूरच्या निवासस्थानी (अमर निवास, महादेव पाटील वाडी, बोर्ला-घाटलागांव, चेंबूर) सकाळी ७ ते १० या वेळेत आहे. अंत्यसंस्कारासाठी पार्थिव रत्नागिरी जिल्ह्यातील खेडच्या काडवली (पाचघर वाडी) येथे नेले जाईल.
कामगारांच्या न्यायहक्कांसाठी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय कामगार सेनेची स्थापना केली. शिवसेनेचे झुंजार नेते, कमांडर दत्ताजी साळवी या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात रमाकांत मोरे यांच्याकडे काही काळ या संघटनेची धुरा देण्यात आली होती. त्यानंतर सूर्यकांत महाडिक यांनीच गेली २० वर्षे या संघटनेचे नेतृत्व केले. महाडिक हे शिवसेनेचे उपनेते होते. नेहरूनगर विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले होते. महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भारतीय कामगार सेनेने कामगारांसाठी अनेक यशस्वी लढे दिले. त्यांच्या निधनामुळे कामगार क्षेत्रातील एक जाणते नेतृत्व गमावल्याची भावना शिवसैनिकांमध्ये निर्माण झाली.