राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील सुमारे १४,४३४ ग्रामपंचायतींच्या निवडणूक मतदान दिनांक १५ जानेवारी २०२१ व २१ जानेवारी २०२१ रोजी आहे. सदर दिवशी सर्व मतदारांना मतदान करता यावे तसेच मतदान टक्केवारी वाढण्यासाठी राज्यनिवडणूक आयोग यांनी दि.४ जानेवारी २०२१ रोजीच्या पत्रानुसार प्रधान सचिव, ऊर्जा उद्योग व कामगार विभाग यांना मतदान दिवशी भरपगारी सुट्टी देण्याबाबत अधिसूचना / परिपत्रक प्रसिद्ध करण्यास सांगितले असून याची प्रत सर्व जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आली आहे.
निवडणूक आयोग पत्र नुसार ज्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये मतदान आहेत तेथील सर्व दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल्स, खाद्यगृह, व्यापार, औदयोगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना यामधील कामगाराने मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी जाहीर करावी असे कळविले आहे.
तसेच ज्या ग्रामपंचायतीच्या लागत च्या क्षेत्रामध्ये औदयोगिक क्षेत्र (MIDC) तसेच महानगरपालिके सारख्या मोठ्या नागरी वसाहती वसलेल्या आहेत त्या भागामधील कामगारांना मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी / सवलत देण्यात यावी असे पत्रामध्ये म्हटले आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या आदेशांचे पालन न केल्यास संबंधित आस्थापनांविरुद्ध आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार आहे असे नमूद केले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार राज्यनिवडणूक आयोग यांनी मतदान दिवशी सुट्टी जाहीर करणेबाबत दि.४ जानेवारी २०२१ नुसार प्रधान सचिव, ऊर्जा उद्योग व कामगार विभाग व सर्व जिल्हाधिकारी यांना पत्र दिले असून अदयापपर्यंत ऊर्जा उद्योग व कामगार विभाग यांनी कोणतीही अधिसूचना / परिपत्रक प्रसिद्ध केले नाही तसेच राज्यातील जिल्हाधिकारी यांनी देखील याबाबत पत्र प्रसिद्ध केले नाही.