वीज कंत्राटी कामगार यांनी केला कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या घरासमोर बसण्याचा निर्धार

मंचर : मंचर विभागातील वीज कंत्राटी कामगारांचे वेतनाचे प्रश्न जुलै २०२० पासून प्रलंबित असून महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघातर्फ महावितरण प्रशासन व कामगार उपआयुक्त कार्यालय, वाकडेवाडी पुणे येथे पाठपुरावा करून देखील प्रश्न न सुटल्यामुळे दिनांक ११ जानेवारी २०२१ पासून कामगार उपआयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.

        या आंदोलनाचा धसका घेत महावितरणचे अधिकारी यांनी कामगार उपआयुक्त कार्यालयात धाव घेत दिनांक १३ जानेवारी २१ पर्यंत मूळ मालक म्हणून आम्ही पगार देऊ असे लेखी आश्वासन कामगार उपआयुक्त यांना देऊन त्याची प्रत संघटनेला दिली.

     दि.१३ जानेवारी २१ ला कामगारांच्या खात्यावर महावितरण प्रशासनाने पगार न टाकल्यास मंचर विभागातील सर्व कंत्राटी कामगारांनी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या घरासमोर बसण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

       या आंदोलनासाठी अथक परिश्रम संघटनेचे महामंत्री सचिन मेंगाळे, संघटनमंत्री राहुल बोडके, कोषाध्यक्ष सागर पवार, पुणे ग्रामीण अध्यक्ष अशोक गहीने, कोषाध्यक्ष सागर आहिनवे, मंचर विभाग अध्यक्ष अविनाश शेटे, संघटनमंत्री दिपक शिंदे यांनी घेतले.