पुणे : भारत फोर्ज कंपनी,मुंढवा पुणे येथील मागील १७ महिन्यापासून प्रलंबित वेतन कराराबाबत दि ५ जानेवारी २०२१ पासून कंपनी प्रवेशद्वारा समोर संघटनेच्या वतीने जनरल सेक्रेटरी संतोष साबळे उपोषणास प्रारंभ करणार होते.
सदर नियोजित उपोषणाची भारत फोर्ज व्यवस्थापनाने दखल घेतली असून प्रलंबित वेतनवाढीचा करार १५दिवसात चर्चेद्वारे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असून नियोजित उपोषण मागे घेण्याची विनंती दि.२ जानेवारी २०२१ रोजीच्या पत्राद्वारे भारत फोर्ज कामगार संघाला केली आहे.
संघटनेने उपोषण हा विषय प्रतिष्ठेचा न बनविता वरील पत्राद्वारे व्यवस्थापनाने दिलेले आश्वासन पाळले जाईल या अपेक्षेने दि. ५ जानेवारी २०२१ पासूनचे नियोजित उपोषण तात्पुरते स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबत दि.४ जानेवारी २०२१ रोजीच्या पत्राने व्यवस्थापनास कळविण्यात आले आहे.
भारत फोर्ज कामगार संघाने घेतलेला वरील निर्णय हा कंपनी व कामगार तसेच औद्योगिक संबंध यांच्या व्यापक हितास प्राधान्य देणार आहे. त्याचा आदर करून दिलेल्या आश्वासनानुसार १५ दिवसात प्रलंबित वेतन कराराबाबत चर्चेद्वारे समाधानकारक तोडगा काढणे आवश्यक आहे.