चाकण : येथील बॉश चासिज सिस्टीम एम्प्लॉईज युनियन व बॉश चासिज सिस्टीम इंडिया प्रा. लिमिटेड, नाणेकरवाडी चाकण, पुणे यांच्यामध्ये वेतनवाढीचा करार संपन्न झाला. सदर करार मध्ये महागाईशी लिंक पगारवाढ देण्याचे मान्य करण्यात आले. दि.१ जानेवारी २०२० ते दि.३१ डिसेंबर २०२३ या चार वर्षाच्या कालावधीसाठी सध्याच्या (३१ डिसेंबर २०१९ रोजीच्या) पगारावर कमीत कमी ८% (आठ टक्के) व जास्तीत जास्त १०% (दहा टक्के) महागाईशी लिंक पगारवाढ देण्याचे मान्य करण्यात आले. म्हणजेच वार्षिक आठ टक्के पेक्षा कमी टक्के महागाई वाढ झाली तरी आठ टक्के पगारवाढ मिळेल किंवा वार्षिक दहा टक्क्यांपेक्षा जास्त महागाई वाढली तरीही दहाच टक्के पगारवाढ मिळेल किंवा आठ ते दहा मध्ये प्रत्यक्ष महागाईमध्ये जी वाढ झाली असेल त्याप्रमाणात पगार वाढ मिळेल.
बॉश चासीज सिस्टीम च्या कामगारांना या कराराद्वारे चार वर्षासाठी किमान वीस हजार तीनशे रुपये ते कमाल तेवीस हजार रुपये पर्यंत पगार वाढ मिळणार आहे. कोविड साथीच्या महामारी मध्ये औद्योगिक अस्थिरता असतानाही अतिशय चांगल्या प्रकारचा, औद्योगिक शांतता टिकवणारा हा करार इतर कंपन्यांसाठी व कामगार संघटना साठी निश्चितच पथदर्शी ठरेल असा विश्वास कंपनीचे एम.डी. अविनाश चिंतावार व कामगार उपायुक्त विकास पनवेलकर यांनी व्यक्त केला.
सदर करारवेळी कंपनीच्या वतीने प्लांट हेड विनोद व्यंकटेश, सि.जनरल मॅनेजर (HR/IR) मोहन पाटील, सि.मॅनेजर (HR) रवळनाथ पाटील, सि.जनरल मॅनेजर (फायनान्स) नरसिंहन यांनी कमिटी म्हणून तर उत्पादन प्रमुख सुनील पाटील व मुकुंद कराडखेडकर यांनी साक्षीदार म्हणून या करारावर सह्या केल्या. संघटनेच्या वतीने अध्यक्ष पंकज दौंडकर, जनरल सेक्रेटरी मनोज पाटील, उपाध्यक्ष प्रवीण पाटील, खजिनदार भीमसेन कुलकर्णी, सहसेक्रेटरी शंकर जाधव,सहसेक्रेटरी चंद्रकांत औसेकर, विजय शिंदे, स्वप्नील गाढवे, आनंद लवूळकर यांनी कमिटी मेंबर म्हणून तर मनीषा पाटील व अतुल पोखरकर यांनी साक्षीदार म्हणून या करारावर सह्या केल्या. पुणे कामगार उपआयुक्त विकास पनवेलकर व समेट-अधिकारी (Conciliation Officer), सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके यांनी या करारावर सह्या केल्या.
श्रमिक एकता महासंघाचे सल्लागार व ऑप्शन पॉझिटिव्ह संचालक अरविंद श्रौती, तसेच श्रमिक एकता महासंघाचे प्रमुख सल्लागार मारुती जगदाळे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपमहापौर केशव घोळवे, अध्यक्ष दिलीप पवार व श्रमिक एकता महासंघाची कार्यकारिणी, इंडस्ट्रिऑल ग्लोबल युनियन, इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह वर्कर्स को-ऑर्डिनेशन च्या सहकार्यातून हा करार संपन्न झाला.