फिलिप्स इंडिया लिमिटेड (Philips India Limited) येथे वेतनवाढ करार संपन्न

१९ महिन्यांच्या चर्चेनंतर २२,५०० रुपयांची भरीव वाढ, कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण

चाकण : फिलिप्स इंडिया लिमिटेड, चाकण व शिवक्रांती कामगार संघटना यांच्यात सन २०२५ ते २०२८ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी वेतनवाढ करार यशस्वीरीत्या संपन्न झाला आहे. तब्बल १९ महिन्यांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर हा करार झाला असून चाकण एमआयडीसी परिसरातील उल्लेखनीय करारांपैकी एक म्हणून याकडे पाहिले जात आहे.

या कराराचे नेतृत्व शिवक्रांती कामगार संघटनेचे अध्यक्ष मा. ॲड. विजयजी पाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. अध्यक्ष संदीप शिंदे, सेक्रेटरी प्रशांत खोगरे, खजिनदार तोफिक नदाफ व संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे कामगारांच्या हिताचा हा करार साकार झाला.

करारातील ठळक मुद्दे:

वेतनवाढ: दि. १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२८ साठी एकूण रु. २२,५००/- वेतनवाढ मान्य.

दिवाळी बोनस व सानुग्रह अनुदान: बेसिकच्या २०% प्रमाणे अंदाजे रु. ३८,०००/- दिवाळी बोनस + रु. १५,०००/- सानुग्रह अनुदान असे एकूण अंदाजे रु. ५३,०००/- चा लाभ.

मेडिक्लेम वाढ: मेडिक्लेम विमा संरक्षण रु. ५ लाखांवरून रु. ७.५० लाख पर्यंत वाढ. आई-वडिलांचा समावेश, ते हयात नसल्यास सासू-सासऱ्यांचा समावेश मान्य.

लॉंग सर्व्हिस अवॉर्ड: १५ वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या कामगारांना रु. ३५,०००/- बक्षीस.

प्रोडक्शन इन्सेंटिव्ह वाढ: रु. १,५००/- वरून रु. २,५००/- करण्यात आला.

विद्यमान सुविधा कायम: कामगारांना मिळणाऱ्या सर्व सुविधा पुढेही सुरू राहणार.

रविवार कामाचा दुहेरी लाभ: रविवारी काम केल्यास दुप्पट पगार + एक भरपगारी सुट्टी मान्य.

विमा संरक्षणात मोठी वाढ: रु. १२ लाख पर्सनल ॲक्सिडेंट विमा व रु. २० लाख टर्म इन्शुरन्स कव्हर मंजूर.

या करारासाठी कंपनी व्यवस्थापनातील प्लांट हेड सचिन हुजरे, एचआर विभागातील जया दळवी, दिनेश दिघे, प्रोडक्शन हेड पुष्कर कुलकर्णी यांनी सकारात्मक भूमिका घेतली. तसेच युवा संघटक प्रथमेश पाळेकर, रवींद्र साठे व गुलाबराव मराठे यांचे विशेष सहकार्य लाभले. 

कंपनी व्यवस्थापन व कामगार यांच्यातील परस्पर विश्वास आणि सकारात्मक संवादामुळे हा करार यशस्वी झाला असून या कराराबद्दल सर्व कामगार बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.