धाराशिव : रांजणी (ता. कळंब) येथील नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेडच्या २५ व्या गाळप हंगामाच्या प्रारंभप्रसंगी समूहाचे संस्थापक अध्यक्ष, कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांनी कारखान्यातील कर्मचाऱ्यांना दहा टक्के पगारवाढ आणि आगामी दिवाळी सणासाठी २५ टक्के बोनस जाहीर केला आहे.
कारखान्याच्या गाळप हंगाम प्रारंभ कार्यक्रमात कर्मचाऱ्यांना १० टक्के पगारवाढ व २५ टक्के बोनस दिल्याबद्दल कामगार संघटनेच्या वतीने ठोंबरे यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले. अध्यक्षांनी घेतलेल्या या निर्णयाचे कामगार वर्गात आणि परिसरात जोरदार स्वागत करण्यात आले. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष ठोंबरे यांनी राज्य शासनाच्या त्रिपक्षीय समितीच्या शिफारशीनुसार कारखान्यातील सर्व पात्र कर्मचाऱ्यांना चालू वर्षातील १ ऑक्टोबरपासून १० टक्के पगारवाढ लागू करण्यात येत असल्याची घोषणाही केली. ते म्हणाले की, नॅचरल उद्योगाने नेहमीच शेतकरी आणि कर्मचारी या दोन्ही घटकांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. साखर उद्योगात सर्वाधिक बोनस देण्याची आपली परंपरा यावर्षीही कायम राखण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना आपली दिवाळी अत्यंत आनंदात आणि उत्साहात साजरी करता यावी, यासाठी यंदाही विक्रमी २५ टक्के बोनस देण्यात येत आहे.
