नवी मुंबई : दिघा येथे ‘सुल्झर पंप्स् इंडिया प्रा. लिमिटेड’ या बहुराष्ट्रीय कंपनीने आपली सहा आकडी बोनस देण्याची परंपरा कायम राखत कामगार कर्मचाऱ्यांना २.५ लाखाहून अधिक बोनस दिला. या कंपनीमध्ये दिवाळीतला बोनस हा कराराप्रमाणे गणेशोत्सवापुर्वीच दिला जातो.
‘सुल्झर पंप्स् इंडिया एम्प्लाॅईज युनियन’ (सेऊ) या अंतर्गत संघटनेचे अध्यक्ष श्री. रुपेश पवार, जनरल सेक्रेटरी श्री. प्रमोद लोटणकर व खजिनदार श्री. माधव सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली हा बोनस वाटप करण्यात आला. दि. ९ ऑगस्ट २०२२ रोजी झालेल्या वेतनवाढ व बोनस कराराप्रमाणे कंपनीने कामगारांना २०२५ सालाचा बोनस दि. 8 सप्टेंबर २०२६ रोजी वाटप केला. गेल्या वर्षी २०२४ सालाचा बोनस अध्यक्ष श्री. रूपेश पवार यांच्या सेऊ संघटनेच्या कामगारांना कमाल बोनस रूपये २,४३,३११/- तर किमान बोनस रूपये २,२५,२३९/- देण्यात आला होता व या वर्षी आपलाच विक्रम मोडून कमाल बोनस रुपये २,६१, ३८०/- ( दोन लाख एकसष्ठ हजार तीनशे ऐशी रुपये ) तर किमान बोनस रुपये २,४६,८६३/- ( दोन लाख सेहेचाळीस हजार आठशे त्रेसष्ठ रुपये ) देण्यात आला.
काही दिवसांपूर्वी कंपनीतील एक कामगार सहकारी श्री. जयकांत कदम हा घरी असताना अचानक आलेल्या अतितीव्र हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले त्यामुळे आज बोनस संदर्भातील जाहीर सभेत सुरुवातीला श्री. जयकांत कदम यांना सर्व कामगार बंधूंतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. एकीकडे बोनसचा आनंद आणि एकीकडे सहकारी गमवण्याचे दुःख यामुळे गाजावाजा व गुलाल न उधळता कार्यक्रम साजरा करण्यात आला.
‘सुल्झर पंप्स् इंडिया एम्प्लाॅईज युनियन’ (सेऊ) या संघटनेने केलेल्या कराराप्रमाणे वाटप झालेल्या बोनसच्या रकमेचा योग्य वापर करा असा सल्ला सेऊचे अध्यक्ष श्री. रुपेश पवार यांनी दिला.
‘सुल्झर पंप्स् इंडिया एम्प्लाॅईज युनियन’ (सेऊ) संघटनेच्या कामगार कर्मचाऱ्यांनी सेऊ कमिटीचे व सुल्झर पंप्स कंपनीचे MD श्री. सुजल शहा साहेब, HR हेड ( इंडिया ) श्री. मारुती नंदन साहेब व सिनियर जनरल मॅनेजर HR / ER श्री. सुनील चक्कनकरन यांचे खूप खूप आभार मानले.

