सातपूर : सॅमसोनाईट साउथ एशिया प्रा. लि., गोंदे (दुमाला, ता. इगतपुरी) येथील व्यवस्थापन आणि नाशिक वर्कर्स युनियन यांच्यात चार वर्षांचा वेतन करार झाला आहे. १ जानेवारी २०२६ ते ३१ डिसेंबर २०२९ या कालावधीतील या करारामुळे कायम कामगारांना वेतन, महागाई भत्ता, बोनस, वैद्यकीय विमा आणि अन्य सुविधांमध्ये भरीव वाढ मिळणार आहे. प्रत्यक्ष लाभांसह प्रत्येक कामगाराला सुमारे २७ हजार १०० रुपयांची एकूण वाढ मिळणार असल्याची माहिती युनियनचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी दिली असे वृत्त पुण्यनगरी वृत्तसंस्थेने दिले आहे.
करारानुसार पहिल्या वर्षी १५ हजार, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी प्रत्येकी २ हजार आणि चौथ्या वर्षी १ हजार रुपयांची वेतनवाढ होईल. त्यामुळे मासिक वेतन ७४ हजार ५०० रुपयांवरून ९४ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचणार आहे. महागाई भत्त्यासह हे वेतन जवळपास एक लाख रुपयांपर्यंत जाणार आहे.
बोनस पहिल्या दोन वर्षांत ९५ टक्के, तर पुढील दोन वर्षांत १०० टक्के करण्यात आला आहे. वार्षिक सहलीसाठी ३ हजार रुपये भत्ता, गांधी जयंतीची अतिरिक्त सशुल्क सुटी आणि कुटुंबासाठी चार लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय विम्याची सुविध मिळणार आहे.
१ जानेवारी २०२६ नंतर निवृत्त होणाऱ्या कामगारांना कायदेशीर लाभांव्यतिरिक्त ३१ हजार रुपये मिळणार आहेत. जुलैच्या वेतनासोबत जानेवारी ते जूनची ९० हजार रुपयांची वेतन थकबाकी आणि महागाई भत्त्याचा फरकही देण्यात येणार आहे. उत्पादनात १२ टक्के वाढ करण्याच्या व्यवस्थापनाच्या प्रस्तावाला कामगारांनी मान्यता दिल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले.

