पिंपरी-चिंचवड : चिंचवड येथील प्रीमियर कंपनीतील गुणवंत कामगार व वृक्षमित्र सुभाष पाटील यांनी एक सामाजिक बांधिलकी जपणारा आदर्श घालून दिला आहे. स्वतःच्या ४१व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी चिखली येथील 'आरंभ बीज बँके'ला ५१ प्रकारच्या देशी आणि दुर्मीळ वृक्षांच्या तब्बल ४ लाख २० हजार बिया दान केल्या.
गेली चार वर्षे सुभाष पाटील स्वतःच्या वयाला अनुसरून देशी वृक्षांच्या बियांचे संकलन करून 'आरंभ बीज बँके'त जमा करत आहेत. यंदा त्यांनी पाडळ, सालई, अजाण, काटेसावर, सोनसावर, टेटू, वाघाटी, भुत्या, वारस, मेढशिंगी, रिठा, पांढरा शिरीष, करवंद, कळंब, शेंद्री, बकुळ, अर्जुन, आईन, ताम्हण, बेल, कवठ, रामफळ, आपटा, कांचन, जांभूळ, पळस, धामण, शिसम, बहावा अशा ५१ प्रकारच्या देशी वृक्ष प्रजातींच्या बियांचा समावेश असलेला मोठा साठा सुपूर्द केला. या बिया त्यांनी पुणे परिसर तसेच कोल्हापूरमधील देवराई क्षेत्रातून संकलित केल्या आहेत.
यावेळी आरंभ बीज बँकेच्या संस्थापक वैष्णवी पाटील व सहकारी उपस्थित होते. 'आरंभ बीज बँके'च्या माध्यमातून गेल्या सहा वर्षांपासून ३५० हून अधिक देशी वृक्षप्रजातींच्या बियांचे संकलन केले जात आहे. या बिया महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकसह विविध राज्यांतील वन विभाग, स्वयंसेवी संस्था व निसर्गप्रेमींना मोफत रोपे तयार करण्यासाठी उपलब्ध करून दिल्या जातात. तसेच जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याशी निगडित 'पांडुरंगाचा बीजप्रसाद' या उपक्रमासाठीही आरंभ बीज बँकेकडून लाखो बियांचा पुरवठा करण्यात येतो.
या बीजसंकलन मोहिमेत सुभाष पाटील यांना पत्नी प्रतिभा पाटील, पुत्र शंभुराजे व शिवनंदन, पुतण्या सुयश, तसेच वृक्षमित्र विलास बोराडे, विराज सरवळे, सुनील सरवळे आणि सचिन बकाले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
“वृक्षारोपण यशस्वी व्हायचे असेल, तर दर्जेदार व स्थानिक प्रजातींच्या बियांची उपलब्धता अत्यंत महत्त्वाची आहे. देशी वृक्षांचे संवर्धन व्हावे आणि अधिकाधिक लोकांनी बीजसंकलनात सहभागी व्हावे, यासाठी हा उपक्रम सुरू ठेवला आहे. एका कामगारानेही पर्यावरणासाठी मोठे योगदान देता येते, हेच मला दाखवायचे आहे.”
“सुभाष पाटील यांच्यासारखे वृक्षमित्र आमच्या चळवळीचा कणा आहेत. त्यांनी दान केलेल्या ४.२ लाख बियांमुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांतील वृक्षलागवड मोहिमांना मोठे बळ मिळणार आहे. देशी वृक्षसंवर्धनाची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी बीजसंकलन आणि बीजवाटप हे कार्य सातत्याने सुरू ठेवले आहे.”
एक कामगार आपल्या वाढदिवसासारखा वैयक्तिक आनंदाचा क्षणही पर्यावरण रक्षणासाठी समर्पित करतो, हा संदेश आजच्या पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.
सुभाष पाटील –7588489524

