उत्तर प्रदेशातील नोएडात पगारवाढीसह अनेक मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. उत्तर प्रदेश सरकारने २१ टक्के पगारवाढीची घोषणा केल्यानंतरही कामगार त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत. किमान वेतनात वाढ करण्याची घोषणा केली असली तरी संतप्त असलेल्या कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या दिवशीही काही ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळ केल्याचे प्रकार घडले आहेत.
अनेक औद्योगिक परिसरातील कारखान्यांबाहेर कर्मचाऱ्यांकडून आंदोलन केलं जात आहे. जोपर्यंत पगार वाढवणार नाहीत तोपर्यंत कामावर येणार नाहीत अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे असे वृत्त सकाळ वृत्तसंस्थेने दिले आहे.
आंदोलन करणारे कर्मचारी आक्रमक झाले असून रस्त्यावर उतरून कंपन्यांच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी करत आहेत. पगारवाढीशिवाय कामाचे तास, सुट्ट्या आणि इतर सुविधांबाबतही कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नोएडात सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरू असून काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. सेक्टर ७०मध्ये क्लिओ काउंटी सोसायटीजवळ कर्मचाऱ्यांनी दगडफेक केली.
पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या १५ पेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेतलं आहे. सोमवारी झालेल्या आंदोलनावेळी हिंसाचार करणाऱ्या अनेकांची ओळख पटवण्यात आली असून इतरांचाही शोध घेतला जात आहे. पोलिसांनी आतापर्यंत जवळपास ३०० जणांना ताब्यात घेतलंय तर ७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोशल मीडियावरून अफवा पसरवणाऱ्यांवरही कारवाई केली जात आहे.
गौतमबुद्ध नगर जिल्ह्यातील बहुतांश औद्योगिक वसाहतींच्या परिसरात कामगार आंदोलन करत आहेत. कारखान्यांबाहेर घोषणाबाजी आणि आंदोलन करत कर्मचाऱी रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलकांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी कर्मचारी त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत.
सोमवारी झालेल्या हिंसक आंदोलनानंतर सरकारने सर्व वर्गातील कामगारांच्या किमान मजुरीत वाढ केलीय. नवे नियम एक एप्रिलपासून लागू असतील असंही सांगण्यात आलंय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निर्णयाला मंजुरी दिलीय. आता अकुशल कामगारांना ११ हजार ३१३ रुपयांऐवजी दरमहा १३ हजार ६९० रुपये तर अर्ध कुशल कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपयांऐवजी १६ हजार ८६८ रुपये किमान पगार दिला जाईल.
