रघुनाथ कुचिक यांचा सरकारला थेट सवाल – “कामगारांच्या चेहऱ्यावर समाधान कधी दिसणार?”
पुणे : महाराष्ट्र राज्य शेती महामंडळातील कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवार दि. १७ मार्च २०२६ रोजी पुण्यात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. हा मोर्चा चर्तुःश्रृंगी मंदिर येथून दुपारी १२ वाजता सुरू होऊन शेती महामंडळाच्या कार्यालयावर धडकला.
या मोर्चामध्ये शेती महामंडळाच्या १४ मळ्यांवरील सुमारे ९ हजार कामगार, सेवानिवृत्त कर्मचारी, रोजंदार कामगार, राजीनामा दिलेले कामगार तसेच मयत कामगारांचे वारस मोठ्या संख्येने सहभागी झाले. कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांमुळे हा मोर्चा काढण्यात आला होता.
कामगारांच्या प्रमुख मागण्यांमध्ये प्रत्येक कामगाराला २ गुंठे जागा देऊन घर बांधून देणे, ४था, ५वा व ६वा वेतन आयोगानुसार थकबाकी देणे, सेवाउपदान, समान कामास समान वेतन तसेच रिट्रेचमेंट कॉम्पेन्सेशन देणे यांचा समावेश आहे.
सन २००२ मध्ये माजी मंत्री रामराजे निंबाळकर यांच्या शिफारशीप्रमाणे तसेच उच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार कामगारांना घरे देण्याचे मान्य करण्यात आले होते. मात्र, गेल्या २४ वर्षांपासून याची अंमलबजावणी झालेली नाही.
तसेच, १५ सप्टेंबर २००९ च्या शासन निर्णयानुसार सुमारे ८१ कोटी १६ लाख रुपयांची थकबाकी अद्यापही कामगारांना देण्यात आलेली नाही. औद्योगिक न्यायालय, अहमदनगर यांनी दिलेल्या निर्णयांवर वारंवार उच्च न्यायालयात अपील दाखल केल्यामुळे कामगारांना न्याय मिळण्यात विलंब होत असल्याची नाराजीही व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, या आंदोलनात शिवसेना उपनेते, सरचिटणीस व भारतीय कामगार सेना नेते रघुनाथ कुचिक यांनी सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. ते म्हणाले, “देवा भाऊ, तुम्ही बहिणींना पावणार कधी? शेतकरी आणि कामगारांचे हाल सुरू आहेत. कामगारांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत नाही. ते समाधान त्यांच्या हक्काच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय मिळणार नाही.”
कुचिक यांनी पुढे स्पष्ट केले की, “कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे. सरकारने तातडीने त्यांच्या मागण्या पूर्ण करून त्यांच्या आयुष्यात समाधान निर्माण करावे.” गेल्या २५ ते ३० वर्षांपासून कामगार संघटना सातत्याने पाठपुरावा करत असून दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी शासनाला तडजोडीचा प्रस्तावही सादर करण्यात आला होता. मात्र, १८ महिने उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने कामगारांनी मोर्चात सहभागी होत आपल्या हक्कासाठी एकजूट दाखवली.

