कंपनी मध्ये भीषण स्फोट, १७ कामगार मृत्युमुखी

नागपूर - जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील 'एस्.बी.एल्. एनर्जी लिमिटेड' या दारूगोळा निर्मिती करणार्‍या आस्थापनात १ मार्च या दिवशी सकाळी ७ वाजता मोठा स्फोट झाला. त्यात १७ कामगार ठार झाले असून अनेक जण गंभीर घायाळ झाले आहेत. घायांळापैकी ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला. स्फोटामुळे कारखान्याचे अवशेष अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत उडाले.

    या आस्थापनात 'डिटोनेटर्स', 'स्लरी एक्सप्लोजिव्ह', 'कास्ट बूस्टर्स', 'सिजमिक एक्सप्लोसिव्हज' यांचे उत्पादन केले जाते. त्यातीलच एका युनिटमध्ये सकाळी स्फोट झाला. घटनेच्या वेळी तेथे ३० हून अधिक कर्मचारी काम करत होते. अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी जाऊन आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पोलीस, स्थानिक प्रशासन आणि आस्थापनाचे बचाव पथक यांनी घटनास्थळी ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर चालू केले. कारखान्याची मुख्य इमारत पूर्णपणे पाडण्यात आली.

    आस्थापन प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि कामगारांचे नातेवाईक यांच्याकडून केला जात आहे. प्रशासनाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून 'दोषींवर कडक कारवाई करावी', अशी मागणी होत आहे.

    या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना राज्यशासन ५ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य करील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केले आहे. संबंधित आस्थापनही मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक साहाय्य देणार आहे.