पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी : ज्येष्ठ औद्योगिक संबंध अभ्यासक श्री नानासाहेब कोळगे लिखित 'कामगारापासून कर्मतत्वाकडे' या मराठी पुस्तकाचे प्रकाशन आकुर्डी येथील हॉटेल क्रियाड (Kyriad) येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. मित्रपरिवार यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास मानव संसाधन (HR) क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील मान्यवर, सुरक्षा अधिकारी, व्यवस्थापन क्षेत्रातील अभ्यासक तसेच विविध क्षेत्रांतील वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लेखक श्री नानासाहेब कोळगे यांनी पुस्तकामागील प्रेरणा आणि लेखनप्रवास उलगडून सांगितला. आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अनुभवांच्या आधारे 'कामगार' ते 'कर्मतत्व' या प्रवासाची मांडणी या पुस्तकातून करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मूल्याधिष्ठित जीवन, शिस्त, सातत्यपूर्ण शिक्षण, कार्यनिष्ठा आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी हीच व्यक्ती आणि संस्थेच्या प्रगतीची खरी गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी नमूद केले.
पुणे एन. आय. पी. एम. श्री सतीश पवार यांनी उपस्थितांचे स्वागत करताना साहित्य, नेतृत्व आणि ज्ञानवृद्धीला चालना देणारे उपक्रम राबविण्याचा संस्थेचा सातत्यपूर्ण प्रयत्न असल्याचे सांगितले.
कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण ठरलेले औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय (DISH) चे अधिकारी श्री सुधीर अनंत शिंदे यांनी पुस्तकाची प्रस्तावना लिहिली असून, त्यांनी पुस्तकाच्या आशयावर सविस्तर भाष्य केले. उद्योगविश्वातील प्रत्यक्ष अनुभव, सुरक्षितता, कार्यसंस्कृती, नेतृत्व, कर्मचारी विकास आणि शिस्त यांचे वास्तववादी चित्रण या पुस्तकात असल्याचे सांगत त्यांनी हे पुस्तक कर्मचारी, पर्यवेक्षक, HR व्यावसायिक आणि नव्या पिढीतील व्यवस्थापकांसाठी उपयुक्त मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
डॉ. विनोद बडवाईक (एच. आर. ग्रुप डायरेक्टर - सकाळ मीडिया समूह यांनी पुस्तकाच्या विचारप्रक्रियेवर प्रकाश टाकताना, हे केवळ अनुभवकथन नसून जीवन आणि उद्योग व्यवस्थापनातील मूल्यांचा दस्तऐवज असल्याचे सांगितले. मानवी वर्तन, संघटनात्मक संस्कृती, आत्मविकास आणि कार्यातील सातत्य यांचा प्रभावी वेध पुस्तकातून घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
पुणे एन.आय. पी. एम. चे श्री सतीश पवार यांनी श्री नानासाहेब कोळगे यांचे अभिनंदन करताना त्यांच्या प्रदीर्घ अनुभवांचे पुस्तकाच्या माध्यमातून झालेले दस्तऐवजीकरण ही भावी पिढीसाठी मोठी ज्ञानसंपदा असल्याचे सांगितले. श्री विक्रमादित्य पवार यांनी नानासाहेब कोळगे यांच्या परिवारा बाबत कृतघ्नता व्यक्त करून या पुस्तकाच्या उच्चांकी विक्री करता शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचा समारोप उपाध्यक्ष श्री बाबासाहेब सोनावणे यांच्या समारोपपर भाषणाने झाला. त्यांनी सर्व मान्यवर, उपस्थित वाचक, सहकार्य करणाऱ्या संस्था आणि आयोजकांचे आभार मानून या पुस्तकातील विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.
या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट (NIPM), पुणे चाप्टर तसेच पिंपरी-चिंचवड-चाकण चॅप्टर यांचे विशेष सहकार्य लाभले. HR क्षेत्रातील व्यावसायिक, उद्योग क्षेत्रातील नेते आणि वाचक यांना या पुस्तक प्रकाशनाशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य NIPM ने केले.
या कार्यक्रमाला NIPM पुणे चाप्टरचे श्री प्रशांत क्षीरसागर व पिंपरी चिंचवड चाप्टर चे अध्यक्ष प्रदीप माणेकर, सचिव नवनाथ सूर्यवंशी यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. यामध्ये मधुकर सूर्यवंशी, रमेश बागल, प्रणव बेहेरे, संतोष मोडवे, किशोर केचे, राहुल वाघ, अतुल पिसाळ, हर्षदीप डोंगरे, सचिन गोरे, डॉ. उल्हास वाघ, संतोष पवार आदी नामांकित कंपन्यातील दिग्गज मान्यवरांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय होती. तसेच श्री नानासाहेब यांचे सासरे श्री सूर्यकांत साळुंखे (फिनान्स-आष्टी शुगर साखर कारखाना) उपस्थित होते.
आजच्या वेगाने बदलणाऱ्या औद्योगिक आणि सामाजिक वातावरणात, विशेषतः Gen Z कार्यक्षेत्रात प्रवेश करत असताना, तांत्रिक कौशल्याबरोबरच मूल्याधिष्ठित, लवचिक आणि सतत शिकणाऱ्या कर्मचाऱ्यांची गरज वाढत असल्याचे या पुस्तकातून अधोरेखित करण्यात आले आहे. बदलत्या कार्यसंस्कृतीत मानव संसाधन व्यवस्थापनासमोरील संधी आणि आव्हाने यांचाही लेखकाने परखड वेध घेतला आहे.
भक्ती-शक्ती, भारतीय मूल्यव्यवस्था, ज्ञानपरंपरा, कार्यसंस्कृती, मानवी वर्तन आणि कर्मयोग या संकल्पनांचा आधार घेत 'कामगारापासून कर्मतत्वाकडे ' हे पुस्तक रोजगाराच्या पारंपरिक संकल्पनेपलीकडे जाऊन कार्याला अर्थपूर्ण योगदानामध्ये रूपांतरित करण्याचा संदेश देते. व्यक्तीचे यश हे केवळ कौशल्यावर नव्हे, तर चारित्र्य, मूल्ये, जिद्द, सातत्य आणि कृतीशीलतेवर अवलंबून असते, हा विचार लेखकाने आपल्या अनुभवातून प्रभावीपणे मांडला आहे.
पुस्तक प्रकाशन सोहळा हा केवळ एका पुस्तकाचा प्रकाशन समारंभ न ठरता, उद्योग, मानव संसाधन, नेतृत्व, औद्योगिक संबंध आणि भारतीय कार्यमूल्यांवर चिंतन घडविणारा वैचारिक संवाद ठरला.

