चंद्रपूर : ताडाळी परिसरातील औद्योगिक कंपन्यांविरोधात स्थानिकांचा रोष तीव्र होत असून, विविध मागण्यांसाठी सुरू करण्यात आलेले बेमुदत अन्नत्याग आंदोलन आता अधिक व्यापक होत असल्याचे चित्र आहे. रोजगारातील कथित अन्याय, स्थानिकांना संधी न मिळणे आणि कामगारांच्या समस्यांकडे दुर्लक्ष या मुद्द्यांवरून आंदोलन छेडण्यात आले आहे असे वृत्त विदर्भ न्यूज एक्सप्रेस वृत्तसंस्थेने दिले आहे.
चमन मेंटॅलिक्स प्रा. लि. तसेच संबंधित कंत्राटी कंपन्या विनस सर्व्हिसेस आणि के.एम.सी. प्रा. लि. यांच्या कार्यपद्धतीवर आंदोलनकर्त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. स्थानिक युवकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिले जात नसल्याचा आरोप करत, या परिस्थितीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
लोक जनशक्ती पार्टी , चंद्रपूर जिल्हा यांच्या नेतृत्वाखाली २३ मार्च २०२६ पासून सुरू झालेल्या या अन्नत्याग आंदोलनात दररोज नागरिकांचा सहभाग वाढत आहे. त्यामुळे प्रशासनावर तातडीने निर्णय घेण्याचा दबाव निर्माण झाला आहे.
युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी आंदोलनस्थळी भेट देत पाठिंबा जाहीर केला. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन उग्र करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी कंत्राटी कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमोल मेश्राम, साबीर भाई ताजी, अभय गेडाम, कुणाल कोवे आणि सोनू चवरे उपस्थित होते.
आंदोलनस्थळी स्थानिकांना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी वातावरण ढवळून निघाले असून, पुढील काही दिवसांत या आंदोलनाची दिशा अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
