मी विजेता कामगार होणारच !

(सदर लेख 'कामगार नामा मॅगझीन' मध्ये प्रसिद्ध झाला आहे)

काम करुन करुन जो गार पडतो, तो कामगार. कामगार म्हणजे फक्त हात-पाय नाहीत, तर ते हृदय आहेत. सकाळी जेव्हा शहर जागं झालेलं असतं, तेव्हा कामगार मात्र सर्वांच्या आधी पहाटेच जागा झालेला असतो. रात्री जेव्हा शहर झोपलेलं असतं. तेव्हा सुध्दा कामगार जागाच असतो, काम करत असतो. आपण ज्याच्या प्रकाशात आपले आयुष्य उजळतो, त्या दिव्याची तार त्याच्या घामातून गेलेली असते. कामगार म्हणजे फक्त मजुरी, पगार घेणारा माणूस नाही, तो समाजाचा कणा आहे. तो अर्थव्यवस्थेचा श्वास आहे, तो राष्ट्राच्या उभारणीतील अदृश्य नायक आहे, पण दुर्दैव असे की, तो दिसतो सगळ्यांना, पण दिसूनही दुर्लक्षित राहतो. त्याच्या कपाळावरच्या घामात आपल्या सुखाची किंमत मिसळलेली असते. तो उन्हात भाजतो, पावसात भिजतो, थंडीत कुडकुडतो, तरीही तक्रार करत नाही कारण त्याला माहित असतं, आज मी काम केलं नाही तर उद्या माझ्या घरी चूल पेटणार नाही. त्याच्याकडे स्वतःच्या मुलांना घडवण्याची स्वप्नं असतात, पण त्यांच्या शिक्षणावर कर्जाची सावली असते.

     कामगार हा केवळ "लेबर" नाही, तो स्वाभिमान आहे. तो संघर्ष आहे, तो जिद्द आहे. म्हणूनच कामगाराला सहानुभूती नको, सन्मान हवा. भीक नको, हक्क हवेत. दया नको, समानता हवी. कामगार सुरक्षित असेल तर उद्योग सुरक्षित राहील. कामगार समाधानी असेल तर देश प्रगती करेल. कामगार शिकलेला असेल तर भविष्य उज्ज्वल होईल, आज गरज आहे ती कामगाराच्या आवाजाला ऐकण्याची, त्याच्या श्रमाला न्याय देण्याची, आणि त्याच्या माणूसपणाला मान देण्याची, कारण कामगार उभा राहिला, तर देश उभा राहतो. चला, माझ्या बांधवांनो, आपण एक उदाहरण पहा.

    आदरणीय नर्स ब्रायन या एक महिला कामगार होत्या. त्या एक परिचारिका होत्या, नर्स होत्या. त्यांना पुरस्कार प्राप्त झाले नाहीत किंवा समाजसुधारक व्यक्ती म्हणूनही त्या प्रसिध्द नव्हत्या, त्यांच्याकडे मोठे पद नव्हते, पण आज जागतिक स्तरावर मॅनेजमेंटमध्ये नर्स ब्रायन यांची ओळख परिणामांची जबाबदारी घेणारी व्यक्ती म्हणून झाली आहे. आज व्यवस्थापन जगत त्यांना ओळखते, ते केवळ एका शब्दामुळे, तो म्हणजे योगदान. योगदान देण्यासाठी पद, अधिकार किंवा मोठा हुद्दा असायलाच हवा, असे नाही, हे नर्स ब्रायन यांनी सिध्द केले. नर्स ब्रायन वरिष्ठ पदावर नव्हत्या, धोरण ठरवणाऱ्या नव्हत्या, व्यवस्थापक नव्हत्या, तर त्या एक विजेता कामगार होत्या.

    नर्स ब्रायन रुग्णसेवा करत होत्या, त्या रुग्णालयाच्या शिस्ती व आदेशांनुसार काम करत होत्या. जेव्हा इतर कर्मचारी फक्त काम पूर्ण करण्यावर लक्ष देत, आदेश पाळण्यात समाधान मानत, कामाचे मोजमाप तासांमध्ये करत, तेव्हा पगार, ओव्हरटाइम, बोनस इत्यादींच्या पलिकडे जाऊन नर्स ब्रायन यांनी आगळा-वेगळा मार्ग निवडला. त्या एक योगदानकर्ता म्हणून कार्यरत राहून त्यांनी आपल्या कर्तव्यांचे पालन केले. त्यांना एका गोष्टीची जाणीव होती की, रुग्ण, डॉक्टर, रुग्णालय, समाज आणि देश या सर्वांना त्यांच्याकडून नेमका कोणता परिणाम अपेक्षित आहे. त्या परिणामांची शंभर टक्के जबाबदारी स्वीकारणारी व्यक्ती म्हणजेच नर्स ब्रायन. त्या कृतीपेक्षा प्रभावावर लक्ष केंद्रित करत.

    त्यांनी शांतपणे कार्यरत राहून समाजाला एक अत्यंत प्रभावी योगदान दिले आहे. त्यांच्या योगदानामुळे रुग्णांचे आरोग्य अधिक चांगले झाले. वैद्यकीय क्षेत्रातील चुका कमी झाल्या. नर्स अर्थात परिचारिका या सेवेला नवी गुणवत्ता मिळाली. आज्ञाधारक कामगारांपेक्षा विचारपूर्वक कृती करणारे कामगार अधिक प्रभावी असतात, हे सिद्ध झाले. सामाजिक योगदानासाठी सामाजिक पद आवश्यक नसते, हे सत्य आहे. साधा कामगार असामान्य पध्दतीने कार्य करु लागला, की औद्योगिक प्रगती होते आणि औद्योगिक प्रगतीमु‌ळे एक समृध्दमय नवराष्ट्र निर्माण होते. कामगार म्हणजे संस्थेचा कणा. भारतातील सर्व कामगारांनी नर्स ब्रायनसारखी चोख कामगिरी केली, तर एक यशस्वी कामगार नामा निर्माण होऊन एक नवीन इतिहास रचला जाईल.

लेखक : डॉ. उमेश कणकवलीकर (९८५०८३८६७७)

हे मी विजेता होणारच! या सुप्रसिध्द पुस्तकाचे लेखक आहेत. त्यांनी आजवर ३० पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत. मी विजेता होणारच! या प्रेरणादायी एकपात्री कार्यक्रमाचे त्यांनी ३५०० पेक्षा जास्त प्रयोग केले आहेत. ते टाटा मोटर्स, भारत पेट्रोलियम, एलआयसी, गोदरेज, महिंद्रा, मारुती सुझकी, महाराष्ट्र पोलीस. सुप्रिम इंडस्ट्रीज, बीव्हीजी, स्टेट बँक इत्यादी संस्थांचे प्रशिक्षक आहेत, त्यांनी १२५ वेळा रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहेत.

मी विजेता कामगार होणारच ! : लेख कसा वाटला या बद्दल आपले मत पुढील लिंक वरती क्लिक करून नोंदवा - Click