खाजगी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! 'या' कर्मचाऱ्यांना मिळणार १५,००० रुपये

नोकरीची सुरुवात करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून नव्याने नोकरीत रुजू होणाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने अलीकडेच ट्विट करून माहिती दिली आहे की, प्रधानमंत्री विकास भारत रोजगार योजना (PMVY / PMVRY) अंतर्गत पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारकडून १५,००० रुपयांचे आर्थिक प्रोत्साहन दिले जाणार आहे.

या निर्णयामुळे देशातील लाखो तरुणांना थेट फायदा होणार असून रोजगाराच्या सुरुवातीला आर्थिक आधार मिळणार आहे.

मंत्रालयाच्या ट्विटनुसार, या योजनेचा लाभ फक्त पहिल्यांदाच EPFO (Employees' Provident Fund Organisation) मध्ये नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच मिळणार आहे. म्हणजेच, जे कर्मचारी पहिल्यांदाच नोकरीत प्रवेश करतात आणि ज्यांचे EPF खाते याआधी कधीच उघडलेले नाही, अशाच कर्मचाऱ्यांना या योजनेअंतर्गत १५,००० रुपयाचे प्रोत्साहन दिले जाईल. योजनेबाबत सविस्तर माहिती pmvry.labour.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्याचे EPFO मध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.

नोकरी सुरू करताना नियोक्ता कर्मचाऱ्याचे EPF खाते उघडतो आणि ते आधार व बँक खात्याशी लिंक केले जाते. एकदा EPFO नोंदणी पूर्ण झाल्यानंतर पात्र कर्मचाऱ्यांना सरकारकडून हे प्रोत्साहन दिले जाते. इच्छुक उमेदवार स्वतःही या पोर्टलवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. दरम्यान, EPFO सदस्यांसाठी PF काढण्याच्या नियमांमध्येही सुलभता आणण्यात आली आहे. नवीन नियमांनुसार, कर्मचारी लग्न, घर खरेदी किंवा नूतनीकरण, मुलांचे शिक्षण तसेच वैद्यकीय उपचारांसाठी PF मधून रक्कम काढू शकतात. नोकरी गमावल्यास, एकूण PF रकमेपैकी ७५% तात्काळ काढण्याची मुभा असून उर्वरित २५% रक्कम १२ महिन्यांच्या बेरोजगारीनंतर काढता येते.

लग्नासाठी ७ वर्षांच्या सेवेनंतर PF मधील ५०% पर्यंत रक्कम काढता येते, तर वैद्यकीय उपचारांसाठी कोणत्याही सेवा कालावधीच्या अटीशिवाय संपूर्ण रक्कम किंवा ६ महिन्यांचा पगार काढण्याची सुविधा आहे. लवकरच EPFO कडून PF ATM कार्डची सुविधाही सुरू होण्याची शक्यता असून त्यामुळे PF व्यवहार अधिक सोपे होणार आहेत. एकूणच, PMVY योजनेअंतर्गत मिळणारे १५,००० चे प्रोत्साहन आणि PF नियमांतील सुलभता ही नव्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे.