अस्टमो फाय प्रायव्हेट लि.(Astemo FIE Pvt. Ltd.) येथे वेतनवाढ करार संपन्न

पुणे : चाकण येथील औद्योगीक क्षेत्रातील नामांकित कंपनी, अस्टमो फाय प्रायव्हेट लि.(Astemo FIE Pvt. Ltd.) ( पूर्वीचे नाव- केहीन फाय प्रा. लि.) कंपनी व्यवस्थापन आणि ॲस्टेमो फाय कामगार संघटना चाकण. यांच्यामध्ये शुक्रवार दिनांक १०/१०/२०२५ रोजी ऐतिहासिक आठव्या वेतनवाढ करारावरती सह्यांचा कार्यक्रम अत्यंत आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला.

कराराची ठळक वैशिष्ट्ये :

कराराचा कालावधी : दि. ०१/१०/२०२४ ते दि.३०/०९/२०२७ असा तीन वर्षांचा राहणार आहे.

एकूण पगारवाढ :  सर्व कामगारांना एकूण पगारवाढ रु.१७,०००/- (सतरा हजार रुपये ) करण्यात आली आहे. नवीन पगार वाढीनुसार सर्व कामगारांचा पगार आता रु.१,०००००/- ( एक लाख रुपये ) होणार आहे.

पगाराचा रेशो : पहिल्या वर्षी ८०%, दुसऱ्या वर्षी १०%, तिसऱ्या वर्षी १०% मिळणार आहे.

फरक : सर्व कामगारांना दि.०१/१०/२०२४ पासून १२ महिन्यांचा फरक दिवाळी अगोदर देण्याचे मान्य करण्यात आले आहे.

पगारी सूटया : A) PL - १५, B) SL - ०७ (१ ने वाढ), C) CL - ०७ (१ ने वाढ), D) PH - ०८

GPA पॉलिसी :
वैयक्तिक अपघात विमा रक्कम रुपये १० लाखावरून १४ लाख करण्यात आली. त्यामध्ये अपघात काळातील गैरहजेरीसाठी आठवड्याला मिळणाऱ्या रक्कमेत ४०००/-रूपयाने ने वाढ करून रु.१००००/- करण्यात आली आहे.

कायमस्वरूपी अपंगत्त्व :
अपघातामुळे किंवा आजारपणामुळे व इतर कारणांमुळे एखाद्या सभासदांस कायमस्वरूपी अपंगत्त्व आल्यास व कामगारास काम करण श्यक्य नसेल तर त्या सभासदांस रु.३,९०,०००/-रुपये आणि सर्व कामगारांचा एक दिवसाचा पगार देण्यात येणार आहे.

मृत्यू सहाय्य योजना :
एखाद्या कामगाराचा मृत्यू झाल्यास सर्व कामगारांचा व सहभागी कर्मचाऱ्यांचा एक दिवसांचा पगार आणि १५ लाख रुपये कंपनीकडून दिवंगत सभासद कामगाराच्या  कायदेशीर वारसास दिले जातील.

वार्षिक हजेरी बक्षीस :
सध्याच्या वार्षिक हजेरी बक्षिस रक्कमेत भरघोस वाढ करण्यात आली आहे.

वैयक्तिक कर्ज सुविधा :
प्रत्येक कामगारास रु.१,२५,०००/- (एक लाख पंचवीस हजार) रुपये इतके बिनव्याजी वैयक्तिक कर्ज देण्याचे मान्य करण्यात आले आहे.

कँटीन सुविधा : आठवड्यातून एकदा नाष्टयासाठी अंडी आणि आठवड्यातून एकदा जेवणात अंडाकरी देण्याचे मान्य करण्यात आले आहे.

बस सुविधा : तळेगाव बस मार्गांवर सेकंड शिफ्ट मध्ये शिफ्टनुसार बस सुविधा देण्यात येणार आहे.

इतर सुविधा : तीन वर्षातून एकदा उच्च प्रतीचे टू-इन-वन जर्किन करारा निमित्त सर्व कामगारांना देण्यात येणार आहे.

शैक्षणिक गौरव योजना : कामगारांच्या मुला-मुलींसाठी दहावी, बारावी, NEET,JEE परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक श्रेणीतील प्रथम तीन विद्यार्थ्यांना विशेष सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

रात्र पाळी भत्ता : तिसऱ्या पाळीसाठी ७०/- रुपये रात्रपाळी भत्ता करण्यात आला आहे.

हिटिंग भत्ता : डाय कास्टिंग विभागात आणि उष्णता असणाऱ्या विभागात प्रत्यक्ष कामं करणाऱ्यां कामगारांसाठी ७०/- रुपये हिटिंग भत्ता करण्यात आला आहे.

सेवा पुरस्कार :  कंपनीत २५ वर्षे सतत सेवा पूर्ण करणाऱ्या कामगारांना उच्च अधिकाऱ्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रशंसापत्र व योग्य सन्मान देऊन सत्कार केला जाणार आहे.

सेवा निवृत्ती भेट : सेवा निवृत्त होणाऱ्या सभासदांना शाल, श्रीफळ, प्रशंसा प्रमाणपत्र आणि आकर्षक स्मृतिचिन्ह देऊन संस्मरणीय पद्धतीने सन्मानित केले जाणार आहे, जेणेकरून हा सन्मान कायमस्वरूपी स्मृतीत राहील.

अनुकंपा सेवा लाभ : एखादा कामगाराचा मृत्यू झाला, एखादा कामगार निवृत्त झाला किंवा त्याला काही कारणांमुळे निवृत्ती घ्यावी लागली तर त्यांच्या मुलाला किंवा मुलीला त्यांची कंपनीच्या निवड प्रक्रियेत नोकरीसाठी निवड झाली तर त्यांना प्रथम प्राधान्यक्रम दिला जाणार आह

     सदर करारावरती व्यवस्थापनाच्या वतीने कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक श्री. सुधीरजी गोगटे , प्लॅन्ट हेड श्री. गजानन शेलार, व्यवस्थापनातील अधिकारी, एच आर हेड श्री. संपत फडतरे, श्री. संतोष वाळुंज, श्री. महादेव गरड, श्री. प्रवीण खराडे, श्री. निलेश माहिमकर, श्री. ललित शहा,  श्री.अमर मगर, श्री. प्रशांत ननावरे, श्री. दत्तात्रय ठाणेकर तसेच संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि कामगार नेते श्री. जीवनशेठ येळवंडे, उपाध्यक्ष श्री.भटु पाटील, उपाध्यक्ष श्री.कालीदास कान्हुरकर, सरचिटणीस श्री. सुरेश उंबरकर, खजिनदार श्री. दिपक टिकार, सहचिटणीस श्री.गोरखनाथ आगे,सहचिटणीस श्री.अतुल पाटील,सदस्य श्री.विकास देशमुख, सदस्य श्री.दत्तात्रय गायकवाड यांनी करारावरती सह्या केल्या.

     सर्व कामगारांचा संघटनेवरील असणारा विश्वास आणि त्यांनी ठेवलेला संयम व दाखवलेल्या एकजुटीमुळेचं तसेच व्यवस्थापनाच्या सकारात्मक सहकार्यामुळे आपला हा ऐतिहासिक आठवा वेतनवाढ करार कुठलाही संघर्ष न करता यशस्वीरीत्या संपन्न झाला आहे.

       सह्यांचा कार्यक्रम झाल्यावर सर्व कामगारांची कंपनीच्या प्रवेद्वारावर भव्य सभा घेण्यात आली. त्यावेळेस व्यवस्थापनाच्या वतीने कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक श्री. सुधीरजी गोगटे, प्लॅन्ट हेड श्री. गजानन शेलार, अस्टेमो फाय इंडिया चे जापनीज प्रॉडक्शन हेड श्री.ओरिकासा सान व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि कामगार नेते श्री.जीवनशेठ येळवंडे, यांनी उपस्थित कामगारांना मोलाचे मार्गदर्शन केले व समुपदेशक श्री. रवींद्र बाविस्कर, कामगार मित्र श्री. दत्तात्रय धामणस्कर यांनी कामगारांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

    सदर करार पूर्ण करण्यासाठी मदत करणाऱ्या सर्व हितचिंतकांचे आणि सहकाऱ्यांचे अध्यक्ष श्री. जीवनशेठ येळवंडे यांनी सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद मानले. सर्व उपस्थित मान्यवर आणि सभासद बंधुचे आभार उपाध्यक्ष श्री. भटू पाटील यांनी मानले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पूजाताई थिगळे यांनी केले. कंपनीच्या गेटवर सर्व कामगार बंधूनी संघटनेच्या नावाचा जयघोष करुन एकमेकांना पेढे भरवुन फटाक्यांची आतिशबाजी करुन आणि DJ च्या तालावर नाचून प्रचंड जल्लोषात आनंद साजरा केला.