रेमंडमधील संप दुसऱ्या दिवशीही सुरू : कामगार अधिकारी, पोलिस अधीक्षकांनी घेतली बैठक
यवतमाळ : रेमंड कंपनीतील कामगारांनी पुकारलेल्या संपावर तोडगा निघावा म्हणून कामगारांनी रेमंड कंपनीत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. दुसऱ्या दिवशी कामगारांनी कामावर परत यावे म्हणून रेमंड कंपनीचे व्यवस्थापन, कामगार अधिकारी, कामगार संघटनांच्या संयुक्त बैठका झाल्या. यावेळी कामगारांनी ॲग्रीमेंट निश्चितीबाबत खात्री द्या नंतरच कामावर येतो, अशी भूमिका घेतली. तब्बल साडेतीन तास चाललेली चर्चा निष्फळ ठरली. आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे दूसऱ्या दिवशीही कंपनीचा संप सुरूच आहे. असे वृत्त लोकमत न्यूज नेटवर्क यांनी दिले आहे.
रेमंड कंपनीमध्ये प्रत्येक चार वर्षांनंतर आर्थिक बाबींसह इतर सवलतीच्या दृष्टीने चर्चा करून करार केला जातो. मार्च २०२४ मध्ये मागील चार वर्षांचा करार संपुष्टात आला. यानंतर करारावर शिक्कामोर्तब झाले नाही. यामुळे कामगारांनी सोमवारी दुपारी ३ पासून कामबंद आंदोलन सुरू केले. रेमंड कंपनीच्या आवारात सुरू केलेल्या या आंदोलनावर तोडगा निघावा म्हणून कंपनीने सोमवारी बैठका घेतल्या. त्यामध्ये तोडगा निघाला नाही. आंदोलक आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम राहिले.
मंगळवारी दुपारी २ वाजता कामगार अधिकारी राहुल काळे, रेमंडचे एचआर विभागप्रमुख चंद्रशेखर पातूरकर, मॅनेजमेंट प्रमुख नितीन श्रीवास्तव, पोलिस अधीक्षक कुमार चिंता, तीन कामगार संघटनांचे प्रतिनिधी यात प्रहार संघटनेचे सचिन देशमुख, विश्वकर्मा संघटनेचे विजय लंगोटे, जनआक्रोश संघटनेचे अक्षय यादव बैठकीला उपस्थित होते. या सर्वांनी जवळपास दुपारी २ ते सायंकाळी ५:३० पर्यंत साडेतीन तास चर्चा केली. मात्र, तोडगा निघाला नाही.
रेमंडमध्ये आयोजित बैठकीला उपस्थित कामगार अधिकारी राहूल काळे, पोलिस अधीक्षक कुमार चिंता, रेमंडचे एचआर चंद्रशेखर पातुरकर, मॅनेजमेंट प्रमुख नितीन श्रीवास्तव, कामगार संघटनेचे प्रतिनिधी सचिन देशमुख, विजय लंगोटे, अक्षय यादव, एपी कुमार चिंता हेही या बैठकीवेळी उपस्थित होते. कामगारांनी कायदा हातात घेऊ नये चर्चेतून तोडगा काढावा असे त्यांनी सांगितले. या ठिकाणी कायदा, सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून ४० पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
अशा आहेत कामगारांच्या प्रमुख मागण्या
- कामगारांचे ॲग्रीमेंट करताना रक्कम 7250/- पेक्षा जास्त असावी.
- संप काळात कामगारांच्या वेतनात कुठलीही कपात करु नये, भत्ता कापला जाऊ नये.
- संपकाळात कामगारावर कारवाई करु नये. यासह १४ मागण्यांच्या पूर्ततेसाठी कामगारांनी हे आंदोलन पुकारले आहे.
दोघेही आपल्या म्हणण्यावर ठाम
कामगारांनी पुकारलेल्या संपावर चर्चा करून तोडगा निघेल; परंतु कामगारांनी आधी कामावर यावे अशी भूमिका मांडली. यावर कामगार म्हणाले, आधी कन्फर्मेशन द्या, त्यानंतरच आम्ही कामावर येतो. यामुळे साडेतीन तास झालेली चर्चा निष्फळ ठरली.