मुंबई : छत्रपती संभाजीनगर जिह्यात ‘एमआयडीसी’मधील कंपन्यांमध्ये माथाडी कामगार नोंदणी तपासणीसाठी विशेष मोहीम राबली जाईल. या तपासणी मोहिमेत माथाडी कामगार बोगस नोंदणी झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कामगारांवर आणि अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल, असे कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
बोगस नोंदणी संदर्भात विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडण्यात आली. लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य अभिजीत पाटील यांनी सहभाग घेतला.
कामगार मंत्री फुंडकर यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेंद्रा ‘एमआयडीसी’ मधील कंपनीमध्ये माथाडी कामगारांच्या बोगस नोंदणी प्रकरणी चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. या चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर याप्रकरणी नियमानुसार आवश्यक कारवाई करण्यात येईल. या प्रकरणातील १७ कामगारांपैकी ११ कामगारांनी राजीनामे दिले आहेत. चौकशी समितीच्या अहवालात जे कामगार दोषी आढळतील त्यांच्यावर आणि दोषी अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल केले जातील.
शासकीय गोदामातील नोंदीत माथाडी कामगारांच्या प्रलंबित अनुदान संदर्भात पुरवठा विभागासोबत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावला जाईल, असेही कामगार मंत्री फुंडकर यांनी सांगितले.