सातारा :येथील प्रस्तावित कामगार हॉस्पिटलसाठी औद्योगिक वसाहतीतील पशुसंवर्धन विभागाची पाच एकर जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कोल्हापूर क्षेत्रीय कार्यालयाच्या परवानगीने कर्मचारी राज्य विमा निगम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली.भूखंड हस्तांतरणाचे पत्र निगमचे शाखा व्यवस्थापक रमेश चांदणे यांनी स्वीकारले. या जागेची मोजणी करण्यात आली असून, हॉस्पिटलच्या उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
सातारा औद्योगिक वसाहतीतील एक लाख कामगार आणि दोन लाख 70 हजार कुटुंबीय वैद्यकीय सुविधांसाठी कर्मचारी राज्य विमा निगमवर अवलंबून आहेत. जिल्ह्यात कामगार हॉस्पिटल व्हावे, यासाठी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ साताराच्यावतीने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यात 100 बेडचे कामगार हॉस्पिटल मंजूर झाले आहे.
यासाठी जागेचे हस्तांतरण पत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कोल्हापूर क्षेत्रीय कार्यालयाकडून नुकतेच देण्यात आले. औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक सी3 मध्ये पशुसवंर्धन विभागाची शिल्लक पाच एकर जागा या हॉस्पिटलसाठी देण्यात आली आहे.
यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या जागेच्या हस्तांतरणाचा निर्णय घेतला. दुग्ध व्यवसाय विकास विभागाने ही जागा ईएसआयसी हॉस्पिटलसाठी हस्तांतरित करण्यास परवानगी दिली होती. ही प्रक्रिया गुरुवारी पूर्ण करण्यात आली.
एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे यांनी भूखंड हस्तांतरणाचे पत्र रमेश चांदणे यांच्याकडे सुपुर्द केले. याबद्दल 'मास'च्या पदाधिकार्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि 'माग'च्या पदाधिकार्यांना धन्यवाद दिले आहेत.