केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालय आणि स्वीगी यांच्यात सामंजस्य करार

नवी दिल्ली : राष्ट्रीय करियर सेवा (एनसीएस) पोर्टलच्या माध्यमातून गिग आणि लॉजिस्टिक्स या क्षेत्रांमध्ये रोजगारविषयक संबंध बळकट करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने आज नवी दिल्ली येथे स्वीगी या कंपनीशी सामंजस्य करार केला. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ.मनसुख मांडवीया आणि केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या (दि.१५ एप्रिल) झाल्या.

    याप्रसंगी उपस्थितांना उद्देशून केलेल्या भाषणात डॉ.मांडविया म्हणाले, “राष्ट्रीय करियर सेवा पोर्टल हा भारतभरातील नियोक्ते आणि नोकरीसाठी इच्छुक यांना जोडणारा अनोखा मंच आहे. दिनांक 31 जानेवारी 2025 पर्यंत प्राप्त आकडेवारीनुसार सध्या देशात सव्वा कोटी उमेदवार नोकरीच्या शोधात असून 40 लाख नोंदणीकृत नियोक्ते असल्यामुळे हा मंच कार्यबळाच्या गतिशीलतेसाठी महत्त्वाची भूमिका निभावत आहे. स्वीगी कंपनीशी आज सुरु करण्यात आलेली भागीदारी सदर पोर्टलला वेगाने विकसित होणाऱ्या गिग आणि लॉजिस्टिक्स विषयक अर्थव्यवस्थेपर्यंत विस्तारण्यात मदत करेल आणि लाखो तरुणांसाठी लवचिक तसेच स्थानाधारित संधी उपलब्ध करून देणे शक्य करेल.”

    डॉ.मांडवीया यांनी या सहयोगी संबंधांचे स्वागत केले आणि एनसीएस पोर्टलच्या माध्यमातून येत्या 2-3 वर्षांत देशात 12 लाख रोजगार संधींच्या संभाव्यतेला चालना देण्याप्रती स्वीगी कंपनीच्या बांधिलकीचे कौतुक केले. “हा सहयोग समान संधींचे प्रतिनिधित्व करतो कारण याद्वारे स्वीगीला वैविध्यपूर्ण, कुशल आणि नोकरीसाठी सज्ज प्रतिभावंतांपर्यंत पोहोचता येईल, आणि त्याच वेळी देशभरातील नोकरीसाठी इच्छुक असलेल्या लाखो उमेदवारांना रोजगार संधींची सुधारित दृश्यमानता आणि पोहोच यांचा लाभ घेता येईल,” केंद्रीय मंत्री म्हणाले.

    या सामंजस्य करारानुसार, स्वीगी त्यांच्या वितरण, लॉजिस्टिक्स तसेच मदतसंबंधी भूमिकांसह गिग संधींचे एनसीएस पोर्टलमध्ये एकत्रीकरण करेल. वास्तव वेळेत होणाऱ्या या एकत्रीकरणातून एनसीएस वापरकर्त्यांसाठी गिग नोकऱ्यांची दृश्यमानता वाढेल आणि त्यांना शहरी तसेच निम-शहरी भागांमध्ये योग्य वेळी आणि सत्यापित केलेल्या कार्यसंधींचा लाभ घेता येईल.