नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीमधील टीडीके इंडिया प्रा. लि. (TDK India Private Limited) या कंपनीतील कामगारांसाठी आनंदाची बातमी असून, त्यांना सरासरी २३ हजार ८५० रुपयांची भरघोस वेतनवाढ मिळाली आहे. टीडीके इंडिया आणि 'सिटू' संलग्न नाशिक वर्कर्स युनियन यांच्यात २०२५-२८ या कालावधीसाठीचा नवीन वेतन करार मंगळवारी (ता. ३) निश्चित करण्यात आला असे वृत्त सकाळ वृत्तसंस्थेने दिले आहे.
या करारानुसार, वरिष्ठ कामगारांना २५ हजार ७०० रुपये, तर कनिष्ठ कामगारांना २० हजार १०० रुपयांची वाढ मिळाली आहे. यामुळे आता कामगारांचे एकूण वेतन ६० हजार ते १ लाख रुपयांच्या दरम्यान पोहोचले आहे. वेतनवाढीसोबतच कामगारांच्या वैद्यकीय विम्यात ५० हजारांची वाढ करून तो ४ लाखांपर्यंत करण्यात आला आहे. दिवाळी बोनस म्हणून एक पगार आणि ६ हजार ८०० रुपये बक्षीस मिळेल. तसेच, ३० वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या कामगाराला १ लाख २० हजारांचा सेवा पुरस्कार आणि मृत कामगारांच्या वारसांना २१ लाखांपर्यंत मदत दिली जाणार आहे.
याप्रसंगी व्यवस्थापनातर्फे प्रबल रे, अविनाश देशपांडे, अरविंद नेगी, योगेश साठे, विवेक झनकर, मनोज पाटील आणि संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, सिताराम ठोंबरे, संतोष काकडे, तुकाराम सोनजे उपस्थित होते. समिती सदस्य बाळासाहेब सोनवणे, संदीप गटकळ, अमर शेवकर, बारकू पवार, प्रमोद शिरोडकर, सोमनाथ घाटोळ, सचिन अहिरराव, सचिन नेरे, योगेश वावरे यांनी करारावर स्वाक्षरी केली. या ऐतिहासिक करारामुळे कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

