नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) देशातील 7.5 कोटी सदस्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता पीएफ काढण्यासाठी ऑटो सेटलमेंट मर्यादा 5 लाख रुपये करण्यात आली आहे.ही मर्यादा आतापर्यंत 1 लाख रुपये होती. म्हणजेच आता पीएफ खातेदार कोणत्याही कागदपत्रांशिवाय इतकी रक्कम काढू शकणार आहेत.
यासोबतच 10 दिवस लागणाऱ्या क्लेम सेटलमेंट आता फक्त 3-4 दिवसात पूर्ण होणार आहे. याशिवाय, EPFO ने लग्न, शिक्षण आणि घर खरेदीसाठी पीएफ ऑटो-क्लेम सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, पीएफ खात्यातून केवळ आजार आणि रुग्णाच्या खर्चासाठी ऑटो-क्लेम उपलब्ध होता.
श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा यांच्या अध्यक्षतेखाली श्रीनगरमध्ये झालेल्या सीबीटीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय, या बैठकीत असे सांगण्यात आले की, EPFO सदस्य आता या वर्षी मे किंवा जूनच्या अखेरीस UPI (UPI PF Withdraw) आणि ATM (ATM PF Withdrawl) द्वारे PF काढू शकतात.
EPFO ने एप्रिल 2020 मध्ये सदस्यांना ऑटो-क्लेम सुविधा देण्यास सुरुवात केली. ही सुविधा सुरुवातीला फक्त 50,000 रुपयांपर्यंत मर्यादित होती. यानंतर, मे 2024 मध्ये, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने पीएफ ऑटो क्लेमची मर्यादा वाढवून ती 50 हजार रुपयांवरून 1 लाख रुपये केली. त्यात आता मोठा दिलासा मिळाला असून ही मर्यादा 1 लाख रुपयांवरून 5 लाखांपर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.