जेजुरी : जेजुरी एमआयडीसीमधील सर्व कंपन्यांमधील 90 टक्के कामगार हे स्थानिक आहेत. याबाबत कोणाचे काही म्हणणे असल्यास चर्चा करून प्रश्न सोडवता येतील. जीमा व कामगारांची जिसा संघटना आजपर्यंत एकत्रच काम करत आहेत.
जेजुरी औद्योगिक वसाहतीत मोठी वाहने उभी करण्यासाठी एमआयडीसीने आम्हाला अद्यापही ट्रक टर्मिनलसाठी प्लॉट दिलेला नाही. आळंदी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने मालवाहतुकीच्या वाहनांना मोठ्या अडचणी येण्याची शक्यता आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी व पोलिस प्रशासन यांची बैठक घेण्यात येणार असल्याचे जेजुरी उद्योजक संघाचे अध्यक्ष डॉ. रामदास कुटे यांनी सांगितले असे वृत्त पुढारी वृत्तसंस्थेने दिले आहे.
जेजुरी एमआयडीसीमधील उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी पोलिस अधिकारी व उद्योजक यांच्या बैठकीचे आयोजन जीमा हॉलमध्ये करण्यात आले होते. या वेळी त्यांनी उद्योजकांशी संवाद साधला. बैठकीसाठी जेजुरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे, पोलिस उपनिरीक्षक महेश पाटील, जीमा संघटनेचे उपाध्यक्ष पांडुरंग सोनवणे, रवींद्र जोशी, शकील शेख, अनंत देशमुख, माजी अध्यक्ष प्रकाश खाडे, व्यवस्थापक जालिंदर कुंभार, महावितरणचे संदीप काकडे, एमआयडीसीचे अधिकारी व उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
औद्योगिक वसाहतीत रात्री उभ्या राहणार्या कंटेनर व इतर वाहनांतून होणार्या डिझेल चोर्या, रस्त्यात कामगारांची लूटमार, विद्युत मंडळाच्या बॉक्समधील चोर्या, दारू पिणार्यांचा त्रास व इतर भुरट्या चोर्या या बाबतच्या तक्रारी उद्योजकांनी बैठकीत मांडल्या. त्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे म्हणाले, रात्रीच्या वेळी काही अनुचित प्रकार घडल्यास तातडीने पोलिसांना कॉल करा.
पोलिस लगेचच तेथे पोहोचतील. सीसीटीव्ही फुटेज चेक करून तसेच नाकाबंदी करून आरोपी पकडणे सोपे होते. एमआयडीसीमध्ये पोलिसांची रोज रात्री गस्त सुरू असते. परिसरात आवश्यक तेथे सर्वत्र उजेड व कॅमेरे असावेत, अशा सूचना उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांनी केल्या.
एमआयडीसीमधील उद्योजकांना कोणी त्रास दिल्यास, दमदाटी केल्यास कोणतीही भीती न बाळगता त्वरित जेजुरी पोलिस ठाण्याशी किंवा थेट माझ्याशी संपर्क साधावा - तानाजी बरडे, उपविभागीय पोलिस अधिकारी, भोर जेजुरी