वालचंदनगरच्या कामगारांचा वेतनवाढीचा कराराचा प्रश्‍न मार्गी; अडीच वर्षे रखडलेला प्रश्‍न सुटला

वालचंदनगर (ता.इंदापूर) : येथील वालचंदनगर कंपनीमधील कामगारांचा गेल्या अडीच वर्षापासुन रखडलेला वेतनवाढीचा कराराचा प्रश्‍न मार्गी लागला असून कंपनीतील ६२३ कामगारांना सीटीसी नूसार ४३६९ ते ५०६९ रुपयांची वेतनवाढ मिळणार असल्याची माहिती आय.एम.डी.कामगार समन्वय संघाचे अध्यक्ष कपिल गायकवाड यांनी दिली असे वृत्त सकाळ वृत्तसंस्थेने दिले आहे.

वालचंदनगर कंपनीतील कामगारांचा वेतनवाढीचा करार गेल्या अडीच वर्षापासुन रखडला होता. गेल्या काही महिन्यापासुन कामगार युनियन व कंपनी व्यवस्थापन यांच्यामध्ये करारासंदर्भात सकारात्मक बोलणी सुरु होती. गेल्या दोन दिवसापूर्वी वेतनवाढीच्या प्रश्‍नावरती तोडगा निघाला असून वेतनवाढीचा कराराचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२७ हे कराराचा कालावधी निश्‍चित करण्यात आला आहे. कामगारांना सीटीसी (काॅस्ट टू कंपनी) नूसार ४३६९ ते ५०६९ रुपयांची वेतनवाढ व कार्यक्षमतेनूसार ६०० रुपयांचा इन्ससेंन्टीव्ह मिळणार आहे. कंपनीच्या इतिहासामध्ये कामगारांना सरसकट वेतनवाढ मिळणार आहे. तसेच मेडिकल पाॅलिसीमध्ये ही बदल करण्यात आला असून सर्व कामगारांचा कॅशलेस हेल्थ इन्सुरन्स काढण्यात येणार आहे.

तसेच महागाई भत्ताचा ११०० रुपयांवरती असलेली कॅप काढण्यात आली असुनयामुळे कामगारांचा फायदा होणार आहे. रखडलेला करार मार्गी लावण्यामध्ये आय.एम.डी.कामगार समन्वय संघाचे मुख्य सल्लागार शिवाजीराव खटकाळे यांनी महत्वाची भूमिका बजावली. करारासंदर्भात कंपनीतर्फे वालचंदनगर कंपनीचे ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंटचे प्रेसिडेंट संतनु घोषाळ व एच.आर,आय.आर. आणि ॲडमिनिस्ट्रेशनचे जनरल मॅनेजर विनायक बुधवंत तसेच आयएमडी कामगार समन्वय संघाचे अध्यक्ष कपिल गायकवाड,सचिव आप्पासाहेब क्षीरसागर, खजिनदार राजकुमार गोरे,सिद्धार्थ चितारे,आबासाहेब रुपनवर,चेतन बोंद्रे,सागर पाटील, सुनिल माने यांनी महत्वाची भूमिका बजावली. वेतन वाढीचा करार जाहीर झाल्यानंतर कामगारांनी गुलाल उधळून आनंद उत्सव साजरा केला.

कामगारांना मिळणणार ६१ हजार ४०० रुपयांचा फरक..

वेतनवाढीचा करार गेल्या अडीच वर्षापासुन रखडला होता.या दरम्यानच्या वेतनातील फरकाची ६१ हजार ४०० रुपयांची रक्कम कामगारांना मिळणार आहे.

कोरोनामध्ये वेतनवाढीचा करार करणारी वालचंदनगर कंपनी..

वालचंदनगर कंपनीला ११० वर्षाचा इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासुन कंपनी देशउभारणीच्या कामामध्ये मदत करत आहे. ऐरोस्पेस,मिसाईल,डिफेन्स,अणुउर्जा क्षेत्रामध्ये कंपनीचे माेलाचे योगदान आहे. कोरोनासारख्या महामारीमध्ये काळामध्ये २०२० मध्ये वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चिराग दोशी यांनी कामगारांचा वेतनवाढीचा करार करुन कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिले होते.

कामगारांच्या कराची वैशिष्ठे...

वालचंदनगर कंपनीतील कामगारांना मिळणार ४३६९ ते ५०६९ रुपयांची वेतनवाढ.

कामगारांच्या कार्यक्षमतेनूसार ६०० रुपयांचा इन्सेन्टीव्ह.

महागाई भत्यावरील ११०० रुपयांची कॅप काढण्यात यश.

कंपनील ६२३ कामगारांना सरसकट मिळणार वेतनवाढ..

कामगारांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी कंपनी सुरु करणार प्रशिक्षण वर्ग.

कामगारांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुंटूबाला २ लाख १६ हजार रुपयांऐवजी मिळणार सुमारे ९ लाख रुपयांची आर्थिक मदत.

वालचंदनगर मध्ये सांस्कृतिक व स्पोर्ट अॅक्टिव्हीटी जोमाने सुरु होणार.