परळमध्ये राज्यस्तरीय कामगार संमेलन, आंदोलनाची घोषणा होणार

कामगार कर्मचारी संघटना संयुक्त महाराष्ट्रतर्फे २८ मार्चला आयोजन; आंदोलनाची घोषणा होणार

मुंबई : कामगार कर्मचारी संघटना संयुक्त महाराष्ट्राच्या वतीने येत्या २८ मार्च रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत परळ येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या महात्मा गांधी सभागृहात राज्यस्तरीय कामगार संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कामगार विरोधी चार श्रमसंहिता व महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात येणार आहे. 

     केंद्र सरकारने कामगार विरोधी चार श्रमसंहिता लागू करण्याचे जाहीर केले आहे या चार श्रमसंहिताना कामगार वर्गाचा तीव्र विरोध आहे. त्यातच महाराष्ट्र सरकारने लोकशाही अधिकारावर हल्ला करणारे महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक पारित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या विधेयकामुळे कामगार कष्टकरी कुठलेही आंदोलन करू शकणार नाहीत. त्यामुळे श्रमसंहिता व जन सुरक्षा विधेयक रद्द करण्यात यावे यासह १५ मागण्यासाठी हे राज्यस्तरीय संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात पंधरा मागण्यांचा ठराव मंजूर करण्यात येईल व २० मे रोजी होणाऱ्या राष्ट्रीय संपाची घोषणा करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे.

कामगारांना उपस्थित राहण्याचे आवाहन

या संमेलनास राज्यातील सर्व प्रमुख कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. कामगार वर्गाच्या मागण्यांना पाठिंबा देणारे राजकीय पक्ष, व्यक्ती, बिगर सरकारी सेवाभावी संस्था, पत्रकार, विचारवंत यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. या संमेलनात राज्यातील सर्व युनियनच्या प्रतिनिधीनी व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने प्रमुख समन्वयक डॉ. डी. एल. कराड, समन्वयक निवृत्ती धुमाळ, एम. ए. पाटील, गोविंदराव मोहिते, राजू देसले, संजय वढावकर, दिवाकर दळवी, विवेक मोंटेरो, विजय कुलकर्णी, श्याम काळे, संतोष चावके, संजय सिंघवी, कैलास कदम, तापती मुखोपाध्याय, मधु परांजपे, मिलिंद रानडे, त्रिशीला कांबळे, सुकुमार दामले यांनी केले आहे.