केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांनी अंधेरी येथील ईएसआयसी रुग्णालय तसेच मुंबईतील डीजीएफएएसएलआय ला दिली भेट

मुंबई : केंद्रीय श्रम आणि रोजगार तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांनी त्यांच्या दोन दिवसीय मुंबई दौऱ्यादरम्यान आज अंधेरी येथील ईएसआयसी रुग्णालय तसेच कारखाना सल्ला आणि श्रम संस्था संचालनालय (डीजीएफएएसएलआय) येथे  भेट दिली.

     ईएसआयसी रुग्णालयाला दिलेल्या भेटीदरम्यान डॉ.मांडवीय यांनी नोंदणी काउंटर, धन्वंतरी मॉड्यूल अंतर्गत कार्यरत ऑनलाईन नोंदणी सुविधा, दंतचिकित्सा कक्ष तसेच अंतर्गत वैद्यकीय उपचार विभागासह विविध सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी तेथे उपस्थित रुग्ण आणि कर्मचारीवर्ग यांचे रुग्णालयात उपलब्ध असणाऱ्या सेवांविषयीचे अनुभव आणि अभिप्राय जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला. 

     विमाधारक कामगारांना दर्जेदार आरोग्यसुविधा पुरवण्याप्रती सरकारच्या कटिबद्धतेवर अधिक भर देत केंद्रीय मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कार्यक्षम आरोग्य सेवा वितरणाला प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या तसेच रुग्णालय नूतनीकरण आणि बांधकाम प्रकल्पांची कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी जलदगतीने काम करण्याचे निर्देश दिले.

     यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी डीजीएफएएसएलआय या संस्थेला भेट दिली. यावेळी मंत्र्यांना व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य (ओएसएच) या संदर्भात संस्थेची महत्त्वाची भूमिका, नियामक आराखडा तसेच सध्या सुरु असलेले प्रशिक्षण कार्यक्रम याबद्दल थोडक्यात माहिती देण्यात आली. या भेटीदरम्यान केंद्रीय मंत्री डॉ.मांडवीय यांनी प्रशिक्षण दालने, परिषद कक्ष तसेच डिजिटल रिसोर्स केंद्रांसह विविध पायाभूत सुविधांना भेट दिली.

     डीजीएफएएसएलआयच्या देखरेखीखाली असलेल्या, विशेषतः औद्योगिक स्वच्छता आणि व्यक्तिगत संरक्षक उपकरण (पीपीई) यांच्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या प्रयोगशाळांच्या बाबतीत अधिक स्वारस्य दर्शवले. यावेळी बोलताना त्यांनी ओएसएच आराखडा बळकट करण्याचे आणि या क्षेत्रातील तांत्रिक कौशल्य  वाढवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

     कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना प्रयोगशाळांची तपासणी तसेच उत्तम देखभालीसह प्रक्रियांच्या डिजिटलीकरणाचा वेग वाढवण्याच्या, आणि नियामक व्यवहारांमध्ये पारदर्शकतेवर लक्ष एकाग्र करण्याच्या सूचना दिल्या.