इल्जीन ग्लोबल इंडिया कंपनीला न्यायालयाचा दणका

सातारा : शिरवळ, ता. खंडाळा येथील इल्जीन ग्लोबल इंडिया या कंपनीने दोन अनोंदीत कामगाराची नोंद न करता मजुरी व लेव्ही न दिल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने कंपनीला दणका दिला आहे. या कामगारांच्या नोंदी झाल्यानंतरची मजुरी व लेव्हीची अशी सुमारे साडेतेरा लाख रुपयांची रक्कम सातारा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाकडे जमा करण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत.मात्र, यावर कंपनीने कोणतीच कार्यवाही न केल्याने कंपनीविरोधात माथाडी कायद्यानुसार जिल्हाधिकार्‍यांकडून रिकव्हरी प्रमाणपत्र जारी करण्यात आले आहे असे वृत्त पुढारी वृत्तसंस्थेने दिले आहे.

    शिरवळ, ता. खंडाळा येथे इल्जीन ग्लोबल इंडिया कंपनी आहे. येथे राहुल पांडुरंग शिर्के व नंदकुमार मुरलीधर कासुर्डे हे दोन माथाडी कामगार कार्यरत होते. त्यांची कंपनीने माथाडी कामगार म्हणून नोंदणी केली नाही. तसेच कामावरही रुजू करून घेतले नाही. त्यामुळे या माथाडी कामगार मंडळाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर न्यायालयाने या कामगारांची नोंदणी करून त्यांचे नियत वाटप करण्याचे आदेश दिले. यानंतर माथाडी कामगार मंडळाने याचा पाठपुरावा करून या दोन कामगारांची मजुरी व लेव्ही व दंड अशी साडे तेरा लाख रूपयांची रक्कम मंडळाच्या खात्यावर वर्ग करावी, अशी मागणी केली. मात्र, त्याची दखल कंपनीने घेतली नाही. याची तक्रार झाल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी कंपनीविरोधात रिकव्हरी प्रमाणपत्र जारी केले आहे. त्यानंतर तहसिलदारांकडून ही रक्कम वसूल करण्यासाठी कार्यवाही केली जाणार आहे.