कठीण परिस्थितीत कामगारांना एकत्र करून जगातील सर्वात मोठी कामगार संघटना दत्तोपंतांनी उभी केली. शून्यातून त्यांनी कामगारांची सृष्टी निर्माण केली.व्यक्तीच्या मागे न जाता तत्त्व व विचाराच्या मागे जाण्यावर त्यांचा आग्रह होता. त्यांनी अनेक कार्यकर्ते घडविले. मर्यादांचा स्वीकार न करता ते आपले कार्य करीत होते. त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण असल्यामुळे विद्यार्थी दशेतच त्यांनी संघटनेची स्थापना केली. दत्तोपंत ठेंगडी यांच्या कार्याचा आलेख मोठा असून स्वयंसेवकाचे सर्व गुण त्यांच्यात होते.
सहनशीलता, मोकळेपणा, सहजता हे गुण त्यांच्याकडून शिकायला मिळते. समाजातील अनेक घटकांतील लोकांना सहभागी करून घेण्याचे संघटनकौशल्य त्यांच्यात होते, असे प्रतिपादन नागपुरातील प्रसिद्ध वक्ते अमोल पुसदकर यांनी केले. स्वदेशी जागरण मंच व स्थानिक स्व. दत्तोपंत ठेंगडी स्मृती समितीच्या वतीने कामगार नेते, आर्वीचे भूषण दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आशीर्वाद मंगल कार्यालय आयोजित व्याख्यानमालेचे ते सातवे पुष्प गुंफत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आ. दादाराव केचे, अॅड. क्षितिजा वानखेडे, आर्वी तालुका संघचालक रमेश नागोसे, स्व. दत्तोपंत ठेंगडी स्मृती समितीचे अध्यक्ष डॉ. विनय देशपांडे यांची उपस्थिती होती.
पुसदरकर पुढे म्हणजे की, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे दत्तोपंत ठेंगडी यांनी जगातील सर्वात मोठी कामगार संघटना, अभाविप, भामसं, किसान सभा, स्वदेशी जागरण मंच या संस्थांची स्थापना केली. कुशल संघटक, नेतृत्व गुण असलेल्या दतोपंत ठेंगडी यांच्या जन्म आर्वीत झाला. त्यामुळे आर्वीकर जनते करीता ही गौरवाची बाब आहे असे ते म्हणाले. स्वाभिमान, स्वदेशी, स्वावलंबन व आर्थिक नीतीमध्ये दत्तोपंत ठेंगडी यांचा आजही मोठा प्रभाव असल्याचेही पुसदरकर म्हणाले.
आ. दादाराव केचे यांनी दत्तोपंत ठेंगडींचे जीवन त्यागाचे प्रतीक असल्याचे सांगितले. प्रास्ताविक व परिचय डॉ. विनय देशपांडे यांनी केले. वैयक्तिक गीत मिहीर भट यांनी सादर केले. संचालन स्वप्नील कठाळे यांनी तर आभार प्रदर्शन विजय घाटनासे यांनी केले.