सातारा : शिरवळ येथील रियटर इंडिया कंपनी व रियटर इंडिया एम्प्लॉईज फेडरेशन यांच्यात सन 2021 पासून विविध प्रश्नांवरून संघर्ष सुरू आहे. संघर्षातून गेल्या दोन वर्षात कामगारांना त्यांचे प्रश्न व न्याय मिळवण्याकरता तीन वेळा संपावर जाणे भाग पडले आहे. त्या पार्श्वभूमीवर कामगारांची सन 2023 व 2024 या दोन वर्षांची वेतनवाढ प्रलंबित होती.
वेतन वाढ व इतर मागण्यांबाबत सहाय्यक कामगार आयुक्त, सातारा यांच्या मध्यस्थीने व्यवस्थापन व संघटनेच्या अनेक बैठका घेण्यात आल्या. सदर बैठकीतून चर्चेद्वारे अनेक प्रश्नांपैकी वेतन वाढीचा प्रश्न अखेर मार्गी लावण्यात आला आहे. 01 एप्रिल 2023 पासून 12% सरसकट वेतनवाढ फरकासह देण्यात आली असून फरकाची रक्कम कामगारांच्या खात्यात जमा झाली आहे.
विशेष बाब म्हणजे सध्या गेले दीड वर्षे कंपनीच्या उत्पादनाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाली असताना कामगारांना दोन वर्षाची प्रलंबित वेतनवाढ फरकासह कंपनीने देऊन औद्योगिक संबंध सुधारण्याचे नवीन पाऊल उचलले असून त्यातून नवीन औद्योगिक संबंधाचे पर्व सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर दिनांक 06.10.2024 रोजी रियटर इंडिया एम्प्लॉईज फेडरेशनची सर्वसाधारण सभा झाली असून सभेत सर्व सभासदांनी आनंद व्यक्त करून फरकाच्या रकमेतून रुपये 6000/- रक्कम संघटनेला देणगी देण्याचा ठराव एकमताने मंजूर केला आहे.
सभेचे अध्यक्ष किरण गोळे हे होते. तर श्रमिक एकता महासंघाचे प्रमुख सल्लागार शिल्पकार मारुती जगदाळे, जनरल सेक्रेटरी रोहित पवार, कार्याध्यक्ष विकास करपे तसेच युनिपॉल इंडिया कामगार संघटना नगर रोड पदाधिकारी दत्तात्रय निळूगडे व झुंजार युवा नेतृत्व निलेश सुर्वे यांनी सभासदांना मार्गदर्शन करून पुढील आव्हानाबाबत सभेत रणनिती ठरविण्यात आली . सभेस 300 सभासद उपस्थित होते.सर्व सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व संघटनेच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहण्याची ग्वाही दिली.