कंत्राटी कामगारांचे आंदोलन, कंपनी आश्वासना नंतर आंदोलन मागे

बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील टाटा स्टील कंपनीच्या कंत्राटी कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी प्रवेश- द्वारावर जोरदार आंदोलन केले. कंत्राटी कामगारांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन कंपनी व्यवस्थापनाकडून मिळाल्यानंतर कामगारांनी आपले आंदोलन मागे घेतले असे वृत्त पुढारी वृत्तसंस्थेने दिले आहे.

     तारापूर औद्योगिक क्षेत्रातील टाटा स्टील कंपनीच्या जवळपास तीनशे कंत्राटी कामगारांनी गुरुवारी सकाळी सातवाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत आपल्या विविध मागण्यासाठी प्रवेश द्वारासमोर घोषणाबाजी करीत जोरदार आंदोलन केले. यापूर्वी बारा टक्के देण्यात येणाऱ्या दिवाळीच्या बोनसमध्ये चार टक्क्‌यांची कपात केल्याने कामगार आक्रमक झाले होते.

     अनेक वर्षे काम करून देखील कंपनी व्यवस्थापनाला कंत्राटी कामागरांची जाण नसल्याचा आरोप कामगारांनी केला असून कंत्राटी कामगारांवर अन्याय केला जात असल्याचे सांगितले. कंपनीमधील कायमस्वरूपी कामगारांइतकेच कंत्राटी कामगार उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र कंत्राटी कामगारांना दिले जाणारे तुटपुंजे वेतन हे वाढत्या महागाईमुळे खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने दहा-दहा वर्ष काम केलेले कामगार कंपनी मधील नोकरी सोडून जात असल्याचा आरोप कामगारांनी केला.

    टाटा स्टील कंपनीच्या जमशेदपुर येथील प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना नऊ वर्षानी कायम केले जाते, परंतु तारापूरच्या प्रकल्पामध्ये पंधरा वर्षे काम करूनही कायम केले जात नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे वार्षिक वेतनवाढ देण्यास असमर्थता, जादा काम करण्यासाठी कंत्राटी कामगारांवर जबरदस्ती केली जात असल्यामुळे नाराज कंत्राटी कामगारांनी व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले. आंदोलन करणाऱ्या कामगारांवर

     अन्याय केला जाणार नाही याची हमी तसेच पंधरा वर्षपिक्षा अधिक कार्यरत कंत्राटी कामगारांना कायम करण्याच्या अटीवर आंदोलन करणारे कंत्राटी कामगार कामावर हजर होण्यास तयार असल्याच्या मागण्या आंदोलन करणाऱ्या कामगारांनी केल्या होत्या. अखेर या मागण्यांवर कुंदन संखे यांनी केलेल्या चर्चेत सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. याप्रकरणी कंपनी व्यवस्थापनाशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.