कंपनी कडून प्रदूषण होत असल्यास उपाययोजना राबविण्याबाबत निर्देश द्यावेत म्हणून मागणी
रांजणगाव एम.आय.डी.सी : रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड हि कंपनी औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्यांमध्ये निर्माण होणारा हानिकारक कचरा गोळा करून त्याची प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया करीत असते. त्यामुळे संपूर्ण औद्योगिक क्षेत्रातील होणारे प्रदूषण रोखून पर्यावरणाचा समतोल राखण्यामध्ये कंपनीचे महत्वपूर्ण योगदान आहे आहे. संपूर्ण औद्योगिक क्षेत्र व आसपासच्या परिसरातील प्रदूषणाचा समतोल राखण्याकरिता कंपनी सुरू राहणे औद्योगिक क्षेत्र व आसपासच्या परिसराकरिता अत्यंत आवश्यक आहे
त्याचप्रमाणे सदर कंपनीत सुमारे 200 ते 250 भूमिपुत्र नोकरीला आहेत.सदर कंपनी बंद केल्यास सदर 200 ते 250 भूमिपुत्रांच्या उपजीविकेचे साधन गेल्याने,त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते या सर्व बाबींचा विचार करून कंपनी बाबत निर्णय घ्यावा असे निवेदन महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर कामगार संघटना यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय यांना देण्यात आल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली
कंपनी बाबत सद्यपरिस्थिती :
महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड या कंपनीत विविध कंपनीतील घातक कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. यासाठी नियमावली आहे. मात्र गेली अनेक वर्षांपासून ही कंपनी नियमांचे उल्लंघन करून चुकीच्या प्रकारे कचऱ्याची विल्हेवाट लावत आहे. असा ग्रामस्थांचा आरोप आहे. याचा परिणाम आसपासच्या गावातील विहिरी व ओढ्यांचे स्त्रोत दूषित झाले आहेत. जमिनी नापीक झाल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत देखील खराब झाले आहे. यामुळे या गावातील नागरिक अनेक आजारांना बळी पडत आहेत.
कामगार संघटना म्हणणे :
महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड कडून काही उणिवा असू शकतात, त्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचना,निर्देश यांचे कंपनी पालन करीत असते व आहे.तरीपण काही उणिवा असतील त्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार योग्य उपाय योजले जात असून कंपनी आसपासच्या परिसरातील प्रदूषणाचा समतोल राखण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असते व आहे. तसेच आसपासच्या परिसरामध्ये सामाजिक बांधिलकीचे विविध उपक्रम राबवित असते.
संपूर्ण औद्योगिक क्षेत्र व आसपासच्या परिसरातील प्रदूषणाचा समतोल राखण्याकरिता,महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लि.ही कंपनी सुरू राहणे औद्योगिक क्षेत्र व आसपासच्या परिसराकरिता अत्यंत आवश्यक आहे.अर्थात योग्य उपाय योजना आवश्यक आहेतच व त्या केल्या जातील.
प्रदूषणाच्या मुद्द्यावरून जर महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लि. कंपनी बंद केली तर संपूर्ण औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्यातून निर्माण होणारा हानिकारक कचरा गोळा करणे व त्याची विल्हेवाट लावण्याची पर्यायी प्रक्रिया/व्यवस्था अजून तरी उपलब्ध असल्याचे ऐकण्यात नाही.
महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लि. कंपनी बंद झाल्यास,त्याचे विपरीत परिणाम इतर कंपन्या व आसपासच्या परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन पर्यावरणाची भयानक मोठी समस्या होऊ शकते. हि बाब विचारात घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सदर कंपनीत सुमारे 200 ते 250 भूमिपुत्र नोकरीला आहेत.सदर कंपनी बंद केल्यास सदर 200 ते 250 भूमिपुत्रांच्या उपजीविकेचे साधन गेल्याने,त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते. याबाबतीतही विचार व्हावा.
प्रदूषणाबाबत काही उणिवा असल्यास, त्याबाबत शासकीय व्यवस्था, लोकप्रतिनिधी व कंपनी व्यवस्थापन यांनी योग्य उपाय-योजना कराव्यात,त्याकरिता काही कालावधी देण्याची गरज आहे. परंतु काही करून संपूर्ण औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्यासाठी आसपासच्या परिसरामधील पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता व भूमिपुत्रांच्या रोजी-रोटी करिता, महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लि. हि कंपनी सुरू राहण्याच्या दृष्टीने सकारात्मक विचार व्हावा अशी मागणी कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या कडे करण्यात आली अशी माहिती कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आली.