कामगाराच्या मृत्यु प्रकरणी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाने केला कंपनीच्या भोगावटादारावर खटला दाखल

शिरूर : रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील जमील स्टील बिल्डिंग इंडीया कंपनीमध्ये कामगाराच्या झालेल्या मृत्यु प्रकरणी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाने दि. २० सप्टेंबर २०२४ रोजी कंपनी भोगावटादार यांच्या विरोधात शिवाजीनगर न्यायालयात खटला दाखल केला आहे असे वृत्त प्रभात वृत्तसंस्थेने दिले आहे.

    यासंदर्भात कंपनीच्या व्यवस्थापनाची चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी भूमिपुत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत कुटे यांनी केली होती. रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील जमिल स्टील कंपनीमध्ये जाॅब हाताळताना शिवबाबु शाहु या कामगाराचा मृत्यु झाला यासंदर्भात कंपनीचे प्रोडक्शन मॅनेजर व सुपरवाइजर यांच्यावर रांजणगाव पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मात्र औद्योगिक वसाहतीमध्ये अशा प्रकारे कामगाराचा मृत्यु होण्याची ही पहिलीच वेळ नसुन कंपनीमधील कामगारांना जड जाॅब हाताळण्याचे कुठलेही प्रशिक्षण दिले जात नाही. तसेच अशा कामावर कुशल कामगारांची नेमणुक केली जात नाही. त्यामुळे परिस्थितीने गरीब असणारे अनेक कामगार अशाप्रकारच्या धोकादायक कामावर घेतले जातात मुळात कंपनी प्रशासन कामगार सुरक्षा व आरोग्य संचनालयाच्या नियमांना पायदळी तुडवून अशा कामगारांना कामावर घेत असुन कामगारांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कंपनी प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी भुमीपुत्र प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सुशांत कुटे यांनी औद्यागिक सुरक्षा व आरोग्य संचनालयाकडे केली होती.

    त्या अनुषंगाने जमिल स्टील बिल्डींग इंडीया प्रा लिमीटेड या कारखान्याच्या भोगावटादार यांच्या विरोधात औद्यागिक सुरक्षा व आरोग्य संचनालयाचे उपसंचालक अं.बा खराडे यांनी सदर कारवाई करुन खटला दाखल केला आहे.