कामगारांना सोळा लाखांची भरपाई; कामगार आयुक्तालयाचा आदेश

पणजी : वेर्णा येथील सिप्ला लिमिटेड या कंपनीत झालेल्या अपघातात मरण पावलेल्या अक्षय विठ्ठल पाटील आणि अक्षय भीमराव पवार यांच्या कायदेशीर वारसांना कामगार आयुक्तालयाने कंपनीकडून भरपाई मिळवून दिली आहे.

    कामगार आयुक्त डॉ. लेविन्सन मार्टिन्स यांनी पाटील याचे वडील विठ्ठल पाटील यांना भरपाईपोटी १६ लाख १४ हजार ६०० रुपये, तर पवार याचे वडील भीमराव पवार यांना १६ लाख ४९ हजार ६२५ रुपये देण्याचा आदेश आज जारी केला. ही रक्कम कंपनीने कामगार आयुक्तालयाकडे धनादेशाच्या स्वरूपात जमा केली होती. या दोघांच्या अंत्यसंस्काराच्या खर्चापोटी प्रत्येकी पाच हजारांचा धनादेशही देण्याचा आदेश जारी केला आहे. 

     सिप्ला कंपनीत २५ जुलै रोजी हा अपघात झाला होता. याची माहिती कामगार आयुक्त कार्यालयाला मडगावच्या उपायुक्त कार्यालयाकडून मिळताच भरपाईसाठी संबंधितांना नोटीसा जारी केल्या होत्या. त्यानंतर १३ ऑगस्ट रोजी संबंधितांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी सुनावणीही घेण्यात आली. या सुनावणीदरम्यान कंपनीने भरपाई देण्याचे मान्य करत धनादेशाद्वारे रक्कम कामगार आयुक्तांकडे जमा केली होती.