ठाणे : सध्या सुरू असलेल्या पावसाळी राज्यपालांच्या अधिवेशनात अभिभाषणाला समर्थन देताना आमदार संजय केळकर यांनी ठाणे शहरातील विविध समस्या मांडताना बंद कंपन्यांतील कामगार, सफाई कामगार, वृत्तपत्र विक्रेते आदी कामगार घटकांना राज्य शासनाने न्याय देण्याची मागणी केली असे वृत्त पुढारी वृत्तसंस्थेने दिले आहे..
ठाण्यात इंडीयन रबर, बॉम्बे वायर रोप आदी बंद कंपन्यांतील शेकडो कामगारांना अद्याप थकबाकी मिळालेली नाही. इंडियन रवर कंपनीतील ४५० कामगारांपैकी सुमारे २०० कामगार मृत्यू पावले आहेत. त्यांना न्याय मिळावा, यासाठी शासनाने योजना आणण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली. रिक्षा चालक-मालक यांच्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन केले. या पार्श्वभूमीवर वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी देखील महामंडळ स्थापन करण्याची मागणी. केळकर यांनी केली.
लाड-पागे आयोगाची अंमलबजावणी सुरू झाली असली तरी सर्व सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने सहजपणे नोकऱ्या मिळाव्यात. न्यायालयात याबाबत असलेली स्थगिती उठवून सफाई कामगारांना राज्य शासनाने दिलासा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. ठाण्यातील उपवन परिसरात लहानसहान उद्योगांतून हजारो कामगार काम करत आहेत. परंतु उद्योग क्षेत्रात त्यांचा अंतर्भाव झाला नसल्याने त्यांना अनेक कामगार योजनांचा लाभ मिळत नाही. यात राज्य शासनाने हस्तक्षेप करून कामगार विभागाच्या माध्यमातून येथील हजारो कामगारांना न्याय मिळवून देण्याची मागणी केळकर यांनी केली.