मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांकडून आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन उभारण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने मंगळवारपासून (ता.९) मुंबई येथील आझाद मैदानावर असंख्य एसटी कामगारांच्या उपस्थितीत दोन दिवसीय धरणे आंदोलनाला सुरुवात झाली आहे. आंदोलनस्थळी एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदिप शिंदे यांनी आंदोलनाची पार्श्वभूमी, मागण्या याबाबात माहिती दिली आहे असे वृत्त नवराष्ट्र वृत्तसंस्थेने दिले आहे.
काय आहेत प्रमुख मागण्या?
एस टी कामगारांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच पगारवाढ देण्यात यावी. मागील पाच वर्षांपासून शिल्लक असलेला वेतनवाढीचा फरक, घरभाडे भत्तावाढीचा फरक, महागाई भत्तावाढीचा फरक एकरकमी देण्यात यावा. तसेच जाचक शिस्त व आवेदन कार्यपद्धतीत बदल करावा, सेवेत असलेल्या व सेवानिवृत्त झालेल्या कामगारांना मोफत प्रवास पास देण्याचा निर्णय घेण्यात यावा, सेवेत असलेल्या व सेवानिवृत्त झालेल्या कामगारांना मोफत वैद्यकीय उपचारासाठी कैशलेस सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, याकरीता निर्णय घेण्यात यावा. या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संयुक्त कृती समितीकडून उभारण्यात आले आहे.
…तर राज्यभर आंदोलन उभारणार
दरम्यान, आमदार कैलास पाटील, आमदार रविंद्र धंगेकर, आमदार विजय पाटील आदींनी आज आंदोलनास्थळी जात एस टी कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्यात येईल, असे आश्वासन तिन्ही आमदारांनी दिले आहे. या आंदोलनात संयुक्त कृती समितीत सहभागी असलेल्या संघटनांचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, राज्य सरकारने या आंदोलनाची दखल न घेतल्यास ९ ॲागष्ट क्रांतीदिनापासून राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.
त्यानंतर कास्ट्राईब रा.प.कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुनिल निरभवणे, एस टी वर्कर्स युनियन (इंटक) अध्यक्ष कैलास कदम, सरचिटणीस मुकेश तिगोटे, एस टी कामगार सेनेचे चिटणीस सुभाष जाधव, एस टी कामगार काँग्रेसचे अध्यक्ष दादाराव डोंगरे, बहुजन रा प कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग वाघमारे, परिवहन मजदुर संघटनेचे सरचिटणीस विनोद गजभिये, रा प मागासवर्गीय अधिकारी, पर्यवेक्षक संघटनेचे अध्यक्ष साहेबराव कसबे, कास्ट्राईब रा प कर्मचारी संघटनेचे विधी सल्लागार उदय मालाधारी, कामगार संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे आदींनी आंदोलनात सहभागी झालेल्या कामगारांना संबोधित केले.