भिवंडीतील कंपनीला भीषण आग, परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोट

भिवंडी : तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सरवली एमआयडीसी परिसरातील डायपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली आहे. आगीमुळे परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोट पसरले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहे असे वृत्त साम वृत्तसंस्थेने दिले आहे.

     अग्निशमन दलाच्या जवान सध्या आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं वृत्त आहे. मात्र, आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यात सरवली एमआयडीची परिसरात सदाशिव हायजिन प्रा.ली ही डायपर बनवण्याची कंपनी आहे.

    मंगळवारी पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास कंपनीला अचानक आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण करत संपूर्ण कंपनीला विळखा घातला. सुदैवाने कंपनीतील कर्मचारी वेळीच बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली.

     आग इतकी भीषण होती, की परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोट पसरले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे आग विझवण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. आग नेमकी कशामुळे लागले याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.