कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सहा कोटींहून अधिक ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. ईपीएफओ सदस्यांना शिक्षण, लग्न आणि घरासाठी आता अडव्हान्स रक्कम काढण्यासाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही.
क्लेम केल्यानंतर तीन ते चार दिवसांत त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. EPF योजना 1952 च्या पॅरा 68K (शिक्षण आणि विवाह) आणि 68B (घरांसाठी आगाऊ) अंतर्गत सर्व दावे ऑटो क्लेम सेटलमेंट सुविधेअंतर्गत आणल्याची माहिती कामगार मंत्रालयाने एका निवेदनातून दिली आहे.
आता ऑटोमॅटिक क्लेम सेटलमेंट
केंद्र सरकारच्या नव्या निर्णयामुळे ईपीएफओ खातेधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाअंतर्गत खातेधारकांनी केलेले वेगवेगळे क्लेम ऑटोमॅटिक प्रणालीने मार्गी लावले जाणार आहेत. ईपीएफओ खातेधारक शिक्षण, लग्न, घरखरेदी, घरबांधणी यासाठी पीएफ खात्यातील पैसे काढू शकतात. त्यासाठी खातेधारकाला क्लेम करावा लागतो. याच क्लेमची संपूर्ण प्रक्रिया आता ऑटोमॅटिक झाली आहे. याबाबत कामगार मंत्रालयाने सविस्तर सांगितले आहे. कामगार मंत्रालयाच्या माहितीनुसार ईपीएफ योजना, 1952 च्या कलम 68 (शिक्षण आणि विवाह) तसेच 68बी (घरासाठी ॲडव्हानस पैसे) अंतर्गत करण्यात आलेले सर्व दावे ऑटो क्लेम सेटलमेंट फॅसिलिटीच्या मदतीने निकाली काढले जाणार आहेत.
कालावधी 10 दिवसांवरून तीन दिवसांवर
ही ऑटो सेटलमेंट प्रक्रिया पूर्णपणे माहिती तंत्रज्ञानावर आधारित आहे आणि त्यात कोणताही मानवी हस्तक्षेप नाही. त्यामुळे अशा ॲडव्हान्ससाठी क्लेम सेटलमेंटसाठी लागणारा कालावधी 10 दिवसांवरून तीन-चार दिवसांवर आला आहे. सिस्टमद्वारे पडताळणी करणे शक्य नसलेले क्लेम परत केले जात नाहीत किंवा नाकारले जात नाहीत. ते दुसऱ्या स्तरावरील छाननी आणि मंजुरीसाठी पुढे पाठवले जातात. गृहनिर्माण, विवाह आणि शिक्षण इत्यादी उद्देशांसाठी तंत्रज्ञानावर आधारित ऑटो क्लेम निकाली काढण्याची प्रणाली अनेक सदस्यांना कमी वेळेत निधीचा लाभ घेण्यास थेट मदत करेल. ही प्रणाली 6 मे 2024 रोजी देशभर लागू करण्यात आली आहे. तेव्हापासून EPFO ने या जलद सेवा वितरण उपक्रमांतर्गत 45.95 कोटी रुपयांच्या 13,011 प्रकरणांना मंजुरी दिली आहे.
