केमिकल कंपनीला भीषण आग, २० पेक्षा जास्त कामगार जखमी

जळगाव : जळगाव एमआयडीसीमधील डी-सेक्टर मधील मोरया केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी १७ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता घडली आहे. या आगीत २० जणांहून अधिक कामगार गंभीररित्या भाजले गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. यामधील काही जखमींना खाजगी तर काहींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे असे वृत्त -लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्थेने दिले आहे.

    या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एमआयडीसी सेक्टर मधील मोरया केमिकल कंपनीत आज बुधवारी १७ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता कंपनीत केमिकल कंपनीत भीषण आग लागली. ही आग कशामुळे लागली याची मात्र माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. दरम्यान आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर औद्योगिक वसाहत मधील अग्निशमन बंब, महानगरपालिकेचा अग्निशमन बंब, जैन हिल्स येथील अग्निशमन बंब असे ३ ते ४ अग्निशमन बंब घटनांसाठी दाखल झाले. यावेळी कंपनीच्या लागलेल्या आगीत आगीचे मोठे लोळ बाहेर पडताना दिसून येत होते. 

    दरम्यान याआगीत सकाळच्या शिफ्टमध्ये काम करणारे २० हुन अधिक कामगार गंभीररित्या भाजले गेल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खाजगी व शासकीय रुग्णवाहिका घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या. दरम्यान जखमी व भाजलेल्या कामगारांना तातडीने मेहरून येथील सारा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. यातील चार ते पाच कामगारांची प्रकृती गंभीर आहे. अजून यात जखमी कामगारांचा आकडा वाढविण्याची शक्यता आहे. यावेळी एमआयडीसीतील कंपनी आणि हॉस्पिटल येथे जखमी झालेल्या कामगारांच्या परिवारांची आणि मित्र नातेवाईकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली.